सिंदखेडराजा : (एशिया मंच वृत्त)
येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी स्थळाला(घुमट)भारतीय पुरातत्व विभागाकडून रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. गेल्या काही वर्षात शहरातील एखाद्या ऐतिहासिक वास्तूला रासायनिक प्रक्रिया केली जाण्याची ही पहिलीच घटना आहे.
घुमट अर्थात राजे लखुजीराव जाधव यांची समाधी १६४० मध्ये बांधून तयार झालेली भारतातील हिंदू राजाची सर्वात मोठी समाधी आहे. या समाधीचा दगड हा "बेसॉल्ट" प्रकारातील आहे. जास्त टणक नसलेला हा दगड उन, वारा, पावसाने काहीसा खराब होत चाललं होता अनेक वेळा मागणी झाल्याने अखेर या दगडावर आतून, बाहेरून रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास २६ लाख रुपयांचा खर्च केला जाईल. आवश्यक त्या ठिकाणी वज्र लेप व रसायन वापरून त्याला पडलेल्या खाचा किंवा पोपडे पडलेल्या जागा भरण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे समाधी स्थळाचा रंग काहीसा बदलणार असला तरीही याचे आयुष्य वाढण्यात मदत होईल. पुढील सात ते आठ वर्ष या वास्तूला रासायनिक प्रक्रिया करण्याचे काम पडणार नाही असे सांगण्यात आले आहे.
