पतीने पत्नीसह दोन वर्षीय चिमुकलीची केली निर्घृण हत्या* आरोपीने ही केली आत्महत्या

पतीने पत्नीसह दोन वर्षीय चिमुकलीची केली निर्घृण हत्या
* आरोपीने ही केली आत्महत्या
चिखली : (एशिया मंच वृत्त)
     पतीने कर्तव्य बजावून पोलिस पत्नी ला घरी आणल्यावर पती-पत्नीत झालेल्या वादातून पतीने पत्नीसह दोन वर्षीय चिमुकलीवर चाकूने सपा-सप वार करीत दोघींची निर्घृण हत्या केली आणि स्वतः कवठळ परिसरातील एका विहीरीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २१ ऑगस्टच्या सकाळी घडली.
       या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील पंचमुखी महादेव मंदिरा जवळील शाहू नगर मध्ये भाड्याच्या घरात राहत असलेल्या किशोर जनार्दन कुटे याने चिखली पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावून पत्नी सौ. वर्षा हिला ड्युटी संपल्यावर आज सकाळी ९ वाजताचे सुमारास घरी आणले. यावेळी दोघा पती-पत्नींमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, किशोर याने पत्नीवर मागेपुढे काही न बघता चाकूने वार केले. यात पत्नीचा जागीच मृत्यु झाला. त्यांची दोन वर्षाची मुलगी कृष्णाली देखील घरीच होती. तिच्या देखील पोटावर वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हे निर्घृण खून केल्यानंतर पती किशोर जनार्दन कुटे याने घरून दुचाकी क्रमांक एम.एच २८ डब्ल्यू ९९७२ स्कुटी ने कवठळ शिवारातील गांगलगाव रस्त्यावर असलेल्या विहिरीत दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
     कवठळ शिवारातील विहीरीत अज्ञात इमाने गळफास घेतल्याची बातमी परिसरात परसल्याने बघ्याची गर्दी जमा झाली होती. त्याठिकाणी एक स्कुटी सुद्धा आढळून आली. सदर स्कुटी ही मयत वर्षा कुटे यांच्या नावावर होती. ही माहिती मृतक वर्षाचा भाऊ संतोष ला समजल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता गळफास घेतलेला इसम त्यांच्या बहिणीचा नवराच असल्याचे समजले. सदर माहिती आपल्या बहिणीला सांगण्यासाठी चिखली येथील एका महिला कर्मचारी यांना सोबत घेऊन वर्षा कुटे यांच्या निवासस्थानी गेला. यावेळी त्यांना वर्षा कुटे (३७ वर्ष) व कु. कृष्णाली कुटे (२ वर्ष) हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. 
       या दोघांची गळा चिरून हत्या केल्याचे दिसून आले. यावेळी सौ. वर्षा हिने हातावर वार अडविल्याने मोठ्या प्रमाणवर जखमा आढळुन आल्या. याबाबत त्यांनी तात्काळ चिखली पोलिसांना कळविल्यावर एकच खळबळ उडाली.
       परीसरातील नागरिकांनी या पती-पत्नीस सकाळी १० वाजता ड्युटी संपवून घरी जातांना बघितले होते, तर त्यांची ८ वर्षांची मोठी मुलगी ओवी शाळेत गेली असल्याने सुदैवाने ती या घटनेतून बचावल्याची अशी चर्चा परिसरात आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहे.