साक्षरता सर्वेक्षणातून शिक्षकांना वगळण्याची मागणी* ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साक्षरता सर्वेक्षणातून शिक्षकांना वगळण्याची मागणी
* ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
           साक्षरता कार्यक्रम सर्वेक्षणामधून अशैक्षणिक काम म्हणून शिक्षकांना वगळण्यात यावे, अशी मागणी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर पवार यांच्या नेतृत्वात २१ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
       राज्यातील शिक्षकांना निरक्षर सर्वेक्षणाचे काम देण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून आदेशीत केले आहे. सदर निरक्षर सर्वेक्षण हे अशैक्षणिक काम असून वेळकाढू असल्याने शिक्षकांचा शैक्षणिक व अतिरिक्त वेळ खर्ची होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच क्रमिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी असलेले तास नक्कीच कमी पडतील. आधीच शिक्षकांना ऑनलाईन कामे, दीड महिन्यात चार चाचण्या घेणे, रोजचे अहवाल देणे, पेपर तपासणी व निकाल तयार करणे, शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी मदत करणे असे इतर भाराभर कामं करावी लागतात. त्यामुळे या अशैक्षणिक कामातून शिक्षकांना वगळून दिलासा द्यावा. जेणेकरून शिक्षक त्यांचे विद्यादान करून क्रमिक अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील.  
      संघटनेच्या उपरोक्त मागणीवर विचार करुन शिक्षकांना न्याय द्यावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन मोतेकर, जिल्हा सचिव अनिल हिस्सल, प्रदेश महासचिव राम वाडीभष्मे, गणेश काकडे उपस्थित होते.