* आक्रमक आंदोलनाचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय्य हक्काकरिता वंचित बहुजन युवा आघाडीने आंदोलनांच्या माध्यमातून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र, त्यावर ठोस कार्यवाही केली जात नसल्याने युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत कार्यकर्त्यांसह २८ ऑगस्ट २०२३ रोजी शहरातील बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात आज गुरुवार २४ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना आकारण्यात येणारे अवास्तव शुल्क माफ करावे, त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे परीक्षा केंद्र देण्यात यावे, परीक्षेसंदर्भातील यापूर्वीचे अनुभव लक्षात घेता परीक्षेची पारदर्शकता कायम राहावी व पेपर फुटीच्या घटना वारंवार होऊ नये, यासाठी सर्वच स्पर्धा परीक्षा घेण्याचे अधिकार महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाला देण्यात यावे, या मागण्यांसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने पाठपुरावा केला जात असल्याचे सतीश पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय्य हक्कासाठी सातत्याने विविध आंदोलनांच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने, बिरबल की खिचडी आंदोलन तसेच १४ ऑगस्ट २०२३ रोजी विराट मोर्चाही काढण्यात आला. मात्र, या जिव्हाळ्याच्या मागण्यांबाबत शासन, प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जाती समूहातील मुलांना गुणवत्ता असताना देखील न्याय मिळत नसल्याने २८ ऑगस्ट २०२३ रोजी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याचा इशारा सतीश पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे.
