* विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याची केली मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील जुनाट बसेसमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही चिंतेची बाब असून याकडे शासनाचे लक्ष वेधावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी १७ ऑगस्ट २०२३ रोजी मंत्रालय, मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
चिखली तालुक्यातील सवणा येथे १६ ऑगस्ट २०२३ रोजी बस अपघातात ४० प्रवाशी जखमी झाले. यामध्ये २५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. स्टेअरिंग फ्री झाल्याने ब्रेक लागला नसल्यामुळे अपघात झाल्याचे चालकाने सांगितले. अपघात घडला ती बस तब्बल १५ वर्षे जुनी आहे. ही बस २००८ मध्ये सेवेत दाखल झाली असल्याची माहिती मिळाली. अशा जुनाट बसेस चालवण्यापेक्षा भंगारमध्ये काढाव्या. नाही तर जागेवर उभ्या कराव्यात. मात्र परिवहन विभागाने प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये, असे निवेदनात नमूद केले आहे. विरोधी पक्षनेते यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांनाही निवेदन देण्यात आले.
बुलडाणा जिल्ह्यातच नाहीतर राज्यभरामध्ये एस.टी. बस अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्यात २५० आगार आहेत. जवळपास १६ हजाराहून अधिक एसटी बस आहेत. त्यापैकी अर्ध्या बसेस जुनाट झाल्या आहेत. बसेसची नियमित सर्व्हिसिंग होणे गरजेचे आहे. ब्रेक फेल होणे, स्टेअरिंग जाम होणे, स्टेअरिंग फ्री होणे, स्टेअरिंग रॉड तुटणे, टायर फुटणे अशा कारणांनी राज्यभर मोठ्या प्रमाणावर अपघात झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांत बुलडाणानजीकच्या राजूर घाटात ब्रेक फेल झाल्यामुळे चार बसचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
* प्रवाशांची सुरक्षितता वाऱ्यावर कशी सोडता येईल?
एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. दररोज जवळपास ५५ ते ६० लाख प्रवाशी बसने प्रवास करतात. प्रवाशांचा एसटी महामंडळावर विश्वास आहे, म्हणून एवढ्या संख्येने प्रवाशी बसने प्रवास करतात. 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे परिवहन महामंडळाचे ब्रीद आहे. असे असतांना प्रवाशांची सुरक्षितता वाऱ्यावर कशी सोडता येईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाने पाऊले उचलावी. याबाबतही विरोधी पक्षनेत्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
* टॅक्सच्या तुलनेत मिळतात अत्यल्प सुविधा :
राज्य सरकारला एसटी महामंडळाकडून दरवर्षी टॅक्स स्वरूपात साडेतीन हजार कोटी मिळतात. तिकिटावरील १७.५ टक्के टॅक्स, इंधनावरील टॅक्सचा यामध्ये समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर टॅक्स शासनाला मिळतो. परंतु त्यालनेत दर्जेदार सुविधा मिळत नाहीत. ही बाब सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. विरोधी पक्षनेत्यांनी ही बाब शासनाच्या लक्षात आणून द्यावी, अशी मागणी जयश्रीताई शेळके यांनी केली आहे.
