* बुलडाणा येथील घटना * एक दिवसीय पोलिस कोठडी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
पंढरपूर यात्रे दरम्यान बस मध्ये स्टोव्ह पेटवून स्वयंपाक करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी कोणतीही कार्यवाही न करण्यासाठी लाच मागणाऱ्या बुलडाणा आगार व्यवस्थापक संतोष वानेरे व वाहक महादेव दगडू सावरकर या दोघांना सात हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर यात्रे दरम्यान बस मध्ये स्टोव्ह पेटवून स्वयंपाक करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी बुलडाणा आगार प्रमुख संतोष महादेव वानेरे वय (५०) वर्ष यांनी व्हिडिओ वरून कोणतीही कार्यवाही न करण्यासाठी तक्रार दाराला ४० हजार रुपयाची लाच मागितली होती. मात्र 35 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार प्रदीप सरकटे यांनी याची तक्रार एसीबी ला दिली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.
बुलडाणा आगारात त्यांचे मावस भाऊ महादेव सावरकर यांच्या मार्फत २८ हजार रुपये तक्रारदाराकडून स्वीकारले आणि उर्वरित 7 हजार रुपयाची लाच स्वीकारताना 21ऑगस्ट 2023 रोजी रात्री शहरातील खामगाव रोडवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या दोघांना रंगेहाथ पकडले आहे.
यांचे विरुध्द पोलीस स्टेशन बुलडाणा शहर येथे अप नं. ७३४ / २०२३ कलम ७(अ), १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक मारोती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास घेवरे पोलीस उपअधीक्षक, श्रीमती शितल घोगरे, पो.नि. सचिन इंगळे, पोहेकॉ मोहम्मद रिजवान, राजू क्षीरसागर, प्रवीण बैरागी, ना. पो. शि. विनोद लोखंडे, जगदीश पवार, रवींद्र दळवी, सुनील राऊत पोकॉ. गजानन गाल्डे, मपोकॉ स्वाती वाणी, चापोका शेख अरशद बुलडाणा यांनी पार पाडली. आज 22 ऑगस्ट रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपींना एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे.
