* विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञाना सोबत व्यवहार ज्ञान सुद्धा गरजेचे - डॉ.सुकेशजी झंवर
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
स्थानिक सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे आयोजित "कामयाब-2023' या निवासी व्यक्तिमत्व विकास शिबिराचा उद्घाटन सोहळा 1 मे 2023 रोजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्त सहभागाने संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड तर अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बनचेे चिफ मॅनेजींग डायरेक्टर डॉ.सुकेशजी झंवर, बुलडाणा अर्बन चॅरीटेबलच्या अध्यक्षा सौ. कोमल झंवर हे होते. तर याप्रसंगी बुलडाणा अर्बनचे विधी सल्लागार अॅड. जितेंद्रजी कोठारी, संचालक गोपालजी चिराणीया,
डॉ. जयसिंग मेहेर, डॉ. रविकिरण राठी यांच्यासह विद्यालयाचे प्राचार्य एल. अलागार सामी यांची देखील उपस्थिती होती.
सुरुवातीला सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुणांच्या हस्ते भारत मातेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभवी कोलते व प्रज्ञा खिल्लारे यांनी करुन दिला तसेच 17 दिवस चालणाऱ्या या शिबीरातील विविध उपक्रमांची माहिती थोडक्यात विषद केली.
आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणातून सांगितले की, कला, क्रीडा, साहित्य व विज्ञान यावर आधारीत विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविण्याचे सांगितले. विद्यार्थिनी फक्त मोबाईल, लॅपटॉप यामध्ये गुंतून न राहता मैदानी खेळ खेळावे असे आवाहन केले.
डॉ.सुकेशजी झंवर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांच्या जीवन शैलीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञान तर घ्यावेच परंतु व्यवहार ज्ञान सुद्धा गरजेचे आहे. पुस्तकी ज्ञानाने त्याला पदवी मिळेल पण व्यवहार ज्ञानाने तो जीवनात सफल होईल, प्रगतीचे शिखर गाठेल. शिबिरार्थीनी आपल्या सोबत आलेल्या विविध राज्यातील विद्यार्थ्यांसोबत राहून त्यांची संस्कृती, आचार विचार जाणून घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच शिबिरार्थीनी या काळात भरपूर पाणी पिण्याचे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तेव्हा सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होवून आपल्याला मिळालेल्या या सुवर्ण संधीचा लाभ द्यावा असे आग्रही प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून केले. तर डॉ.रविकिरण राठी यांनी कामयाब शिबीराच्या माध्यमातून आयुष्यात आपण कामयाब व्हाल अशी शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिली. याशिबिरामध्ये विविध साहसी उपक्रम घेण्यात येतात. यामध्ये सकाळी सैनिकी प्रशिक्षण, विविध खेळाचे प्रशिक्षण जसे मल्लखांब, रोपमल्लखांब, स्विमिंग, स्केटींग, फुटबॉल, क्रिकेट, घोडेसवारी, रॅपलींग, वॉल क्लाँबीग, बुद्धीबळ, कॅरम, नृत्य, गायन, इंग्रजी संभाषण, कॅम्प्युटर इत्यादी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहकार विद्या मंदिरच्या बक्सलॅण्ड विभागाच्या नर्सरीच्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. तर शिक्षिकांनी दिमाखदार नृत्य सादर करीत उपस्थितांना अचंबित केले. "कामयाब-2023' या शिबिरामध्ये यावर्षी सुमारे 200 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून यामध्ये हैद्राबाद, मध्यप्रदेश, छत्तीसगढ यासह वर्धा, नागपूर, परभणी, नांदेड, पुणे, नाशिक, मुंबई येथुन देखील विद्यार्थी आलेले आहेत. शिबीरातील प्रशिक्षकांचा परिचय व आभार प्रदर्शन प्रज्ञा खिल्लारे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताने झाली. या कार्यक्रमाला शाळेचे, प्रशासकीय अधिकारी तसेच प्रशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद उपस्थित होते.
