अमरावती विभागातून अनिल जाधव यांना विभागीय आदर्श तलाठी पुरस्कार

अमरावती विभागातून अनिल जाधव यांना विभागीय आदर्श तलाठी पुरस्कार
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       अमरावती विभागातून सन 2022 -23 चा आदर्श तलाठी पुरस्कार चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे तलाठी या पदावर कार्यरत असणारे अनिल तुकाराम जाधव यांना प्रदान करण्यात आला. शासनाच्या विविध योजना उत्कृष्टपणे राबल्याबद्दल महाराष्ट्र दिनी विभागीय आयुक्त शण्मुगराजन एस. यांच्या सहीनिशी असलेले आदर्श तलाठी पुरस्काराचे प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून जिल्हाधिकारी एच. पी. तुम्होड यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. 
       जिल्हा पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र राज्याचा ६३वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, प्रभारी जिल्हा पोलिस अधिक्षक थोरात, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत आदी उपस्थित होते.
      तलाठी अनिल जाधव यांनी 2012 पासून ते आजतागायत विविध शासकीय उपक्रमात महत्त्वाचे योगदान दिले आहे. तलाठी साझा वांजरखेडा, शेलसूर केळवद येथील कार्यक्षेत्रानंतर सध्या ते सावरगाव डुकरे येथे कार्यरत आहे. आतापर्यंतच्या सलग अकरा वर्षाच्या सेवेत त्यांनी नैसर्गिक आपत्ती व आपत्कालीन स्थितीत सतर्क राहून दाखवलेली कार्यतत्परता, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, नदी खोलीकरण अभियान, पीक कर्ज वाटप करणाऱ्या बँकांच्या सहायाने शेतकरी कर्ज मेळाव्याचे आयोजन, कोरोना काळातील जनजागृती, धान्य वितरणाचे कार्यक्रम, लोकसभागातून पांदण रस्ते व शेत रस्ते, रक्तदान शिबिरे यासारख्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी अभिनयाने यशस्वी केली आहेत. या अगोदरही शंभर टक्के सातबारा डिजिटल साईन पूर्ण केल्याबद्दल तसेच निवडणूक कार्यक्रमांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल शासन स्तरातून तलाठी जाधव यांना गौरविण्यात आले होते.