* संदीपदादा शेळके यांची कृषी अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पुरवठा करण्याबाबत राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या नेतृत्वात 17 एप्रिल 2023 रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खरिप हंगामाच्यादृष्टीने आवश्यक कामे वेळेपूर्वीच उरकण्याकडे त्यांचा कल आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु झाली आहेत. खते, बियाणे भरुन ठेवण्यासाठी तयारी केली जात आहे.
पेरणी तोंडावर आली की, बाजारात खते, बियाणांचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागतो. यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता कृषी विभागाने पुरेशी तयारी करुन ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांना थेट बांधावर खत, बियाणे उपलब्ध करण्याचा कृषी विभागाचा उपक्रम असेल तर राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशन सहकार्य करण्यासाठी तयार आहे. शेतकऱ्यांना बांधावर खत पुरवठा करण्यासाठी कृषी विभागासोबत काम करण्याची तयारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शैलेशकुमार काकडे, दीपक महाराज सावळे, संजय लोखंडे, रवींद्र काकडे, तानाजी पैठणे, गणेश जाधव आदी उपस्थित होते.
राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशन सदैव शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर आहे. अनेक शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन खत खरेदी करावे लागते. यामध्ये त्यांचा वेळ जातो. शिवाय जास्तीचे पैसे खर्च होतात. शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनच्यावतीने मूळ किंमतीत थेट बांधावर खत पुरवठा करण्याचा उपक्रम राबवला जातो. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ होतो. गतवर्षी १२० टन खताचा बांधावर पुरवठा करण्यात आला होता.
