बेरोजगारांच्या प्रलंबित कर्ज प्रकरणासाठी आता वंचीत उभारणार बँकांविरूध्द लढा* व्हिबीए युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतिष पवार यांचे आवाहन

बेरोजगारांच्या प्रलंबित कर्ज प्रकरणासाठी आता वंचीत उभारणार बँकांविरूध्द लढा
* व्हिबीए युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतिष पवार यांचे आवाहन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       बेरोजगार युवकांसाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनासाठी विविध महामंडळांकडून युवकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र बँक कर्मचारी व अधिकारी बँक स्वतःच्या खिशात असल्यासारखे वागतात.यामध्ये सुधारणा व्हावी व शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा पातळीवर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. ज्या-ज्या तरुणांची बँकांमध्ये कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत त्या सर्वांची माहिती व्हॉट्स नंबर ७७२०९९९३४५ वर पाठवावी. जेणेकरून मोठे आंदोलन उभे करून बँकांना धडा शिकवता येईल व संबंधित दोषी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करता येईल. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे व माहिती पाठवण्याचे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतिष पवार यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.
     पत्रकात नमूद आहे की, आजचे शिक्षण हे रोजगार पुरक नसल्याकारणाने 50% युवकाकडे रोजगारासाठी लागणारी कौशल्य देखील नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर युवक हे नैराश्यामध्ये जाऊन गुन्हेगारी व व्यसनाकडे वळताना दिसत आहेत. यावर थोड्या प्रमाणात का होईना पर्याय म्हणुन शासन पातळीवरून काही योजना राबवल्या जातात. याद्वारे तरुणांना संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण तथा आवश्यक ते भांडवल उपलब्ध करून दिल्या जाते. यामध्ये शासनाच्या काही यंत्रणा जसे की खादी ग्रामोद्योग, जिल्हा उद्योग केंद्र , महात्मा फुले महा मंडळ ,संत रविदास महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ इत्यादी यंत्रणा तरुणांना रोजगाराच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रभावी कामगिरी करताना दिसत आहेत. हा शासनाचा उपक्रम स्तुतीस पात्र व प्रेरणादायी आहे. यामुळे काही ठिकाणी स्वयं रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. परंतु असे निदर्शनात येत आहे की, एकीकडे ही मंडळ चांगली कामगिरी करत असताना बँक मात्र या धोरणाप्रती नकारात्मक भूमिका घेताना दिसत आहे. तरुणांचे व्यवसायासाठीचे अर्ज भरून घेण्यापासून संपूर्ण प्रशिक्षण देण्यापर्यंतचे काम ही मंडळ चोखपणे करत आहेत. तरुणांमधील नैराश्य बाजूला करून तयार झालेला प्रशिक्षित तरुण त्याचा
आत्मविश्वास वाढत आहे. आत्मविश्वास तयार झाल्यानंतर ज्यावेळेस तरुण नैराश्यातून बाहेर येतो व आता आपण आपला व्यवसाय करून स्वतःच्या पायावर राहिलं पाहिजेही भूमिका घेऊन तो बँकेत जातो त्यावेळेस मात्र त्याची ससेहोलपट सुरू होते. बँक अधिकारी व कर्मचारी त्याला योग्य ती वागणूक न देता त्याची पिळवणूक करतात. शासकीय मंडळ तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी जी मेहनत घेतात व तरुणांना जो चांगला अनुभव येतो तेवढाच वाईट अनुभव हा बँकेत गेल्यानंतर त्या तरुणाला मिळतो. बँकेच्या अधिकारी ज्या प्रकरणांना जमानतदार लागत नाही त्यासाठी त्याला जमानत दाराची मागणी करतात. ज्या प्रकरणांमध्ये मॉर्गेज म्हणून काही लागत नाही, त्यामध्ये मॉर्गेज ची मागणी करतात . एका वेळेस सर्व त्रुटी न सांगता प्रत्येक वेळेला एक वेगळी त्रुटी सांगण्याचे काम करतात व बराचसा कालावधी त्या तरुणांचा बँकेमध्ये चकरा मारण्यासाठी जातो व शेवटी मंडळमार्फत प्रशिक्षित झालेला तरुण हा खचून जाण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते. बँक कर्मचारी या तरुणांना अतिशय तुसड्या पणाची वागणूक देताना दिसतात. 
       थोड्याफार फरकाने हे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यामुळे शासन राज्य व केंद्रस्तरावर राबवत असलेल्या योजनांचा फज्जा उडत आहे. तसेच विविध मंडळाचे उत्कृष्ट कामगिरी करत आहे त्यांची मेहनत पूर्णपणे वाया जाते बँकेच्या या नकारात्मक धोरणामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा हेतू हा साध्य होत नाही. उलट बँक कर्मचारी व अधिकारी बँक स्वतःच्या खिशात असल्यासारखे वागतात .यामध्ये सुधारणा व्हावी व शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी करिता जिल्हा पातळीवर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.