यांची नियुक्ती
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना म्हणून आपली ओळखल्या जाणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या विदर्भ उपाध्यक्षपदी मलकापूरचे विरसिंह राजपूत तर विदर्भ संघटकपदी बुलढाण्याचे सिद्धार्थ आराख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
व्हॉईस ऑफ मीडियाचे विदर्भाचे अधिवेशन १६ एप्रिल २०२३ रोजी नागपूर येथे पार पडले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के व विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक यांनी विदर्भाच्या नविन कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये विदर्भातील अकरा जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे बुलढाणा जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले मलकापूरचे विरसिंह राजपूत यांना बढती देत विदर्भाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तर जिल्हा सरचिटणीसपदी कार्यरत असलेले बुलढाण्याचे सिद्धार्थ आराख यांची विदर्भ संघटक म्हणून या कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाने देशातील २८ राज्यांत आपले मोठे जाळे निर्माण केले आहे. या संघटनेच्या नागपूर येथील विदर्भ स्तरीय अधिवेशनात अकरा जिल्हयांतील सहाशे पत्रकार उपस्थित होते. यावेळी पत्रकारांचे आरोग्य, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, आर्थिक सुबकता, कौशल्य विकास, पत्रकारांची घरे यासह इतर विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, माजी खासदार हंसराज अहिर, शेतकरी नेते रविकांत तुपकर, भुपेश मुतूला, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले, चेतन बंडेवार, विनोद बोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. विदर्भाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विरसिंह राजपूत व विदर्भ संघटकपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ आराख यांचा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक, सामाजिक उपक्रम समितीचे अध्यक्ष आनंद आंबेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
