पिकविम्यासाठी रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक…! * कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात ठिय्या* आठ दिवसांत शेतकऱ्यांना रक्कम देण्याचे मिळाले लेखी आश्वासन

पिकविम्यासाठी रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक…! 
* कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात ठिय्या
* आठ दिवसांत शेतकऱ्यांना रक्कम देण्याचे मिळाले लेखी आश्वासन
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
        पिकविमा आणि अतिवृष्टीची मदत या प्रश्नांवर शेतकरी नेते रविकांत तुपकर कायम लढा देत आहेत. विमा कंपनीने ३१ मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही हजारो शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नसल्याने रविकांत तुपकरांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत १३ एप्रिल २०२३ रोजी शेतकऱ्यांसह जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय गाठले आणि ठिय्या मांडला. शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळाल्याशिवाय उठणार नाही, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान तुपकरांनी प्रधान सचिव एकनाथराव डवले यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करुन पिकविम्याचा प्रश्न मांडला. अखेर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याचे लेखी पत्र तुपकरांना दिल्यानंतर या आंदोलनाची सांगता करण्यात आली.
      अतिवृष्टीची मदत, पिकविमा आणि नुकसान भरपाई यासाठी रविकांत तुपकर सातत्याने लढा देत आहेत. एल्गार मोर्चा, मुंबईतील जलसमाधी आंदोलन आणि त्यानंतर बुलढाण्यात आत्मदहन आंदोलन करुन तुपकरांना तरुंगात जावे लागले तरीही त्यांनी आपला लढा कायमच ठेवला आहे. रविकांत तुपकरांच्या आंदोलनांमुळे जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना १५९ कोटी रुपये मिळाले आहे, हे आंदोलनाचे फलीत ठरले आहे. परंतु अद्यापही ५० ते ७० हजार शेतकरी पिकविम्याच्या रकमेपासून वंचित आहेत त्यामुळे त्यांना तातडीने पिकविमा अदा करावा, अशी मागणी रविकांत तुपकरांनी लाऊन धरली होती. संबधित कंपनीने ३१ मार्च पर्यंत शेतकऱ्यांना पिकविमा अदा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु ही तारीख उलटून गेली तरी अद्यापही पिकविम्याची रक्कम न मिळाल्याने रविकांत तुपकरांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयात धडक दिली. कृषि अधिक्षकांच्या कक्षात त्यांनी ठिय्या मांडत पिकविम्याची रक्कम मिळाल्याशिवाय उठणार नाही, अशी भूमिका घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले त्यामुळे कृषि कार्यालयात तणाव निर्माण झाला होता. यावेळी रविकांत तुपकर यांनी प्रधान सचिव एकनाथराव डवले यांच्याशीही भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करुन पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची बाजू मांडली.     पिकविम्यापासून वंचित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना रक्कम मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका तुपकरांनी घेतल्यामुळे यंत्रणा तातडीने कामाला लागली. आठ दिवसांत शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम अदा केली जाईल, असे लेखी पत्रच कृषि अधिक्षकांनी रविकांत तुपकर यांना दिल्यानंतर त्यांच्यासह आंदोलक शेतकरी शांत झाले. तुपकरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पिकविम्यापासून वंचित असलेल्या ५० ते ७० हजार शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.
* आंदोलन मागे घ्या : 
      रविकांत तुपकर यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता कृषी विभागाने तातडीने पीकविमा कंपनी आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी तुपकरांना लेखी पत्र देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. १३ एप्रिल २०२३ रोजी आपणाशी झालेल्या चर्चेप्रमाणे प्रधानमंत्री पिक योजना खरीप हंगाम सन २०२२-२३ अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या जोखीमेच्या बाबींतर्गत अद्यापपर्यंत भरपाई वाटप न झालेल्या शेतकऱ्यांना येत्या आठवडाभरात जिल्हा स्तरीय समितीची सभा आयोजित करुन पिकविमा कंपनी मार्फत नुकसान भरपाई रक्कम तत्काळ अदा करण्याची कार्यवाही केली जाईल, असे या पत्रात नमुद आहे.
* जिल्हाधिकाऱ्यांचीही घेतली भेट : 
       जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील ठिय्या आंदोलनानंतर रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड यांचीही भेट घेतली. पिकविमा आणि अतिवृष्टीची मदत तातडीने अदा करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. शेती मशागतीचा हंगाम आता सुरु होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज असल्याने पिकविमा आणि अतिवृष्टीची मदत मिळाल्यास शेती मशागतीची कामे करता येतील, यासाठी शेतकऱ्यांना सदरची रक्कम तत्काळ अदा करावी, अशी विनंती रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.