समाजाला महात्मा फुले यांच्या विचारांची गरज : ॲड. धनराज

समाजाला महात्मा फुले यांच्या विचारांची गरज : ॲड. धनराज 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
         क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे समाज क्रांतीचे जनक असून आजच्या निर्माण झालेल्या प्रत्येक समस्येचे उत्तर हे महात्मा फुले यांच्या विचारात आहे. महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार आजच्या परिस्थितीत आशेचा किरण आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विधीतज्ञ ॲड. जय मंगल धनराज यांनी केले. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित 'सत्यशोधक विचार काळाची गरज' या विषयावर ते बोलत होते.
        शहरातील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक शाळेत हे व्याख्यान पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित मित्र माधवराव हुडेकर होते. त्यांनी सत्यशोधक विचार हा विज्ञाननिष्ठ असून त्या माध्यमातून समाज परिवर्तन शक्य आहे असे सांगतानाच समाजाने या विचारापासून दूर जाऊ नये असे आवाहन केले. आ. संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे यांनीही महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक उत्सव समितीचे अध्यक्ष सदानंद माळी यांनी केले. यावेळी क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा वारसा आपल्या कार्याने पुढे चालवून त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणाऱ्या दाम्पत्यांचा 'सावित्री ज्योती पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये रुक्मिणीबाई अहेर व गणपत अहेर, सुनीता हुडेकर व रमेश हुडेकर, वर्षा राजनकर व अशोक राजनकर, संगीता सरोदे व चांगो सरोदे यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन डॉ. शिवशंकर गोरे तर आभार प्रदर्शन प्रियंका सुरोशे यांनी केले. 
       कार्यक्रमाला महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानेरे, सावता मंडळाचे अध्यक्ष के. टी. पांडव, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. शोण चिंचोले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल खरे, सचिव गजानन गवई यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला ॲड. सुमित सरदार, दामोदर बिडवे, लक्ष्मणराव घुमरे, संजय खांडवे, गजानन पडोळ, ॲड. शरद राखोंडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा फुले माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहलता मानकर, सुरेश चौधरी, जगदीश मानतकर, प्रदीप डांगे, गोपाळ निळकंठ, गजानन घिरके, प्रिती डांगे, अश्विनी घिरके, वंदना निळकंठ, गजानन हुडेकर आदींनी परिश्रम घेतले.