* ५ हजारांचा दंड: ग्राहक मंचाचा निकाल
मेहकर : (एशिया मंच वृत्त)
मिठाच्या थैलीवर छापील महत्तम किमतीपेक्षाही अधिक रक्कम ग्राहकाकडून घेणाऱ्या मेहकर येथील एका सुपर मार्केटच्या संचालकास बुलडाणा ग्राहक मंचाने दणका दिला असून, ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मेहकर येथील डोणगाव मार्गावर असलेल्या एका किराणा मॉलमधून मनीष भीमराव रामटेके यांनी सेंधे मीठ खरेदी केले होते. मात्र, दुकानदाराने त्यांना त्यासाठी जास्तीची किंमतं आकारली होती. २५ रुपये किंमत असतांना ३५ रुपये किंमत कशी लावली, याबाबत विचारणा करण्यासाठी रामटेके दुकानदाराकडे गेले असता दुकानदाराने त्यांना अयोग्य वागणूक देत त्यांचा अपमान केला. प्रकरणी मनीष रामटेके यांनी ग्राहक मंचाकडे दाद मागितली असता किराणा मॉलच्या संचालकास जिल्हा ग्राहक मंचाने ८ हजार रूपये दंड ठोठावला. त्यातील ५ हजार रूपये दंडस्वरुपात असून, तीन हजार रूपये ग्राहक मंचामध्ये प्रकरणासाठी ग्राहक रामटेके यांना आलेला खर्च म्हणून देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिला आहे. व्यंकटेश सुपर मार्केटच्या संचालकांविरोधात हा निर्णय ग्राहक मंचाने दिला आहे. प्रकरणात व्यंकटेश सुपर मार्केटकडूनही त्यांचे म्हणणे ग्राहक मंचाने मागितले होते. परंतु, त्यांनी कोणतेही पुरावे सादर केले नसल्याने मिठाची ही लढाई मनीष रामटेके जिंकले आहेत. सोबतच ४५ दिवसांच्या आत दंडाची रक्कम न भरल्यास ९ टक्के व्याजाच्या परताव्यासह ही रक्कम संबंधित ग्राहकाला द्यावी, असेही ग्राहक मंचाच्या निकालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
हे प्रकरण मे २०१९ मधील होते. याप्रकरणात रामटेके यांनी चंद्रप्रकाश चरखा आणि कविता चरखा यांच्या व्यंकटेश सुपरमार्केट विरोधात तक्रार दाखल केली होती. २४ जानेवारी २०२३ रोजी प्रकरणात जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष विश्वास ढवळे, सदस्य जयश्री खांडेभराड आमि मनीष वानखेडे यांनी उपरोक्त निर्णय दिला. सेवेत त्रुटी झाल्याचेही जिल्हा ग्राहकमंचाने निकालात नमूद केले.