अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास ४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
साडेनऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग व छेड काढणाऱ्यास बुलडाणा न्यायालयाने ४ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा १ मार्च २०२३ रोजी सुनावली. संदीप गणेश तायडे (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये चिखली तालुक्यातील पेठमध्ये राहणाऱ्या संदीप तायडेने हे गैरकृत्य केले होते.
पीडिता ही तिच्या भावासोबत बसलेली असताना, आरोपी संदीपने तिच्या भावाला पुड्या आणण्यासाठी दुकानावर पाठवले व पीडितेचा विनयभंग करत तिची छेड काढली. पीडितेने हा प्रकार तिच्या आई- वडिलांना सांगितला. त्यांनी आरोपीस समजावण्याचा प्रयत्न केला असता, उलट त्यांनाच आरोपीने धमकावून शिवीगाळ करत पीडितेला जिवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या तक्रारीवरून प्रकरणात चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या आधारे आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र बुलडाणा न्यायालयात करण्यात आले.
प्रकरणाच्या सुनावणीत फिर्यादी पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. पीडितेची आई व पीडितेची साक्ष यात महत्त्वाची ठरली. यासोबतच घटनास्थळी पंच, पीडितेच्या जन्मतारखेच्या अनुषंगाने शाळेचे मुख्याध्यापक व तपास अधिकारी मोहन पाटील यांची साक्षही वादी पक्षातर्फे नोंदविण्यात आली होती. साक्षीदारांच्या साक्षी घटनेला पूरक, सुसंगत व विश्वासार्ह असल्या कारणाने आणि वादी पक्षाच्या सरकारी वकील अॅड. सोनाली सावजी देशपांडे यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद पाहता, न्यायालयाने आरोपीला प्रकरणात दोषी मानत ४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सोबतच २ हजार दाखल रुपये दंड ठोठावला. तसेच दंडाच्या रकमेतून दीड हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याबाबत निर्देशित केले आहे. याव्यतिरिक्त अधिकच्या नुकसान भरपाईसाठी प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठविण्याबाबत निकालपत्रामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात वादी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. सोनाली सावजी देशपांडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.