माझा एकटयाचा नव्हेतर पाच जील्याती जिल्ह्यातील पदविधरांचा विजय* नवनिर्वाचित आमदार धिरज लिंगाडे यांचे प्रतिपादन* महाविकास आघाडीच्यावतीने लिंगाडेंच्या विजयाचे जल्लोषात स्वागत

माझा एकटयाचा नव्हेतर पाच जील्याती जिल्ह्यातील  पदविधरांचा विजय
* नवनिर्वाचित आमदार धिरज लिंगाडे यांचे प्रतिपादन
* महाविकास आघाडीच्यावतीने लिंगाडेंच्या विजयाचे जल्लोषात स्वागत
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
         जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात भाजपाचे अमरावती पदविधर मतदार संघाचे आमदार डॉ. रणजित पाटील यांनी कोणतेही ठोस कार्य केले नाही. त्यांना पदविधरांना भेटण्यासाठी वेळचं नव्हता अशा प्रकारचा रोष अकोला, अमरावती, यवतमाल, वाशिम व बुलडाणा जिल्हयातील शेकडो पदविधरांनी प्रचारादरम्यान माझेशी बोलतांना प्रकट केला. तेंव्हाचं या पदविधरांसाठी मोठे ठोस कार्य करण्याची मी मनाशी खुणगाठ बांधली. वेळ कमी होता. एकाच व्यक्तीने पाच जिल्हयात फिरून पदविधरांच्या भेटी घेणे शक्य नव्हते अशावेळी जिल्हयाचे माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हयाचे नेते  डॉ. राजेंद्र शिंगणे व काँग्रेस चे नेते मंडळी यांना बुलडाणा जिल्हयाची धुरा सोपवून मी इतर चार जिल्हयात पदविधर मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष् फिरून माझे काम केले. त्यांचा मी ऋणी आहे असे सांगून, भाजपाचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे निकटवर्तीय डॉ. रणजित पाटील यांच्याकडे पदविधरांसमोर जाण्याइतके काहीचं नव्हते असा आरोप करून या निवडणुकीत माझा झालेला विजय माझा एकटयाचा नव्हेतर, पाच जिल्हयातील हजारों पदविधरांचा विजय असून तो मी त्यांना समर्पित करतो, असे प्रतिपादन अमरावती पदविधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार धिरज लिंगाडे यांनी केले.
       महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार धिरज लिंगाडे यांच्या विजयानिमित्त बुलडाण्यात 4 फेब्रुवारी 2023 रोजी महाविकास आघाडीच्यावतीने जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथे लिंगाडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, श्याम उमाळकर, संजय राठोड, लक्ष्मणदादा घुमरे, आ. राजेश एकडे, माजी आमदार हर्षवर्धन  सपकाळ, संजय राठोड, माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच नेते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सभेच्या प्रारंभी शहरातून आमदार लिंगाडे यांची स्वागत रॅली काढण्यात आली. तदनंतर रॅलीचा समारोप गांधी भवन येथे  सभेत करण्यात आला. प्रास्ताविकात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाम उमाळकर यांनी लिंगाडेंच्या विजयासाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी एकदिलाने कार्य केल्याचे सांगून भविष्यातही ही एकजुट कायम ठेवण्याचे आवाहन केले. आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी देखील धिरज लिंगाडे यांच्या विजयाचे स्वागत करून अगदी कमी वेळेत यश प्राप्त केल्याने लिंगाडे हे सौभाग्यशाली असल्याचे मत व्यक्त केले. माजी आमदार हर्षवर्धन  सपकाळ यांनी धिरज लिंगाडे यांचा विजय म्हणजे भाजपा सरकारची उलटीगिनती सुरू असल्याचे संकेत असल्याचे सांगितले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही अशीचं एकजुट दाखवून भाजपाला चारीमुंडया चित करण्याचे आवाहन केले. यावेळी शिवेसेनेचे संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी देखील विचार व्यक्त केले. सभेला मोठया संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.