रविकांत तुपकर तीन दिवसांपासून भूमिगत* मुंबई- बुलडाणा पोलिसांची शोध मोहीम सुरु* प्रशासन हायअर्लट मोडवर

रविकांत तुपकर तीन दिवसांपासून भूमिगत
* मुंबई- बुलडाणा पोलिसांची शोध मोहीम सुरु
* प्रशासन हायअर्लट मोडवर
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ११ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांसह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. हा इशारा दिल्यानंतर तुपकर गेल्या तीन दिवसांपासून भूमिगत आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी देखील बंद आहे. दुसरीकडे कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी यांच्या भावना देखील तीव्र असल्याने प्रशासनाचा ताण वाढला असून सर्व प्रशासन अर्लट मोडवर आहे. 
        मुंबई आणि बुलडाणा पोलीस तुपकरांच्या मागावर आहेत. बुलडाणा शहर पोलिसांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजीच रविकांत तुपकरांना नोटीस बजावली आहे. सदर प्रश्न शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरुपाचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सदरचे आंदोलन करु नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटले आहे. तर दुसरीकडे तुपकर आपल्या भूमिकेवर ठाम असून शहीद झालो तरी चालेल, असे त्यांनी म्हटले आहे, त्यामुळे आता हे आंदोलन पेटण्याची आणि परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
         बुलडाणा किंवा मुंबई यापैकी कोठेही आत्मदहन करणार, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. त्यामुळे ११ फेब्रुवारीला नेमके ते कुठे पोहचतील हे सांगता येत नाही. त्यांच्यासोबत किती शेतकरी येणार? असाही प्रश्न आहे. काही पदाधिकारी, कार्यकर्ते बुलडाण्यात पोहचतील, काही मुंबईत येतील अशीही शक्यता आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत,  त्यामुळे एकंदरीतच तुपकरांच्या या आंदोलनामुळे मुंबई आणि बुलडाणा पोलीस तणावात असून पोलीस कसून तुपकरांचा शोध घेत आहेत. बुलडाणा पोलिसांच्या तुपकर यांच्या निवासस्थानाकडे सारख्या चकरा सुरु आहेत, परंतु तुपकर भूमिगत असल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. हजारो शेतकऱ्यांच्या घरात आजही सोयाबीन-कापूस पडून आहे. हजारोंना पीकविमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे, हा रोष आंदोलनात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन देखील सतर्क आहे. तुपकरांच्या मागील आंदोलनांचा अनुभव पाहता या आंदोलनात नेमके काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्हाधिकारी या आंदोलनाबाबत गंभीर असून पिकविमा व अतिवृष्टीच्या नुकसानभरपाई संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. यातून काय तोडगा निघतो हे बघणे गरजेचे आहे.