लोणार : (एशिया मंच वृत्त)
माहे सप्टेंबर व आक्टोंबर मध्ये लोणार तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेल्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले त्या नुकसानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शैलेश सरकटे सह शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दिला आहे.
तालुक्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन मुंग, उडीद, कपाशी सह सर्वच पिकाचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचा तात्काळ सर्वे करण्यात यावा असा आदेश शासनाने दिला होता. त्यानुसार सर्व्हे करण्यात आला परंतु प्रशासनातील काही निगरगठ्ठ हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यामुळे शासनाची मदत शेतकऱ्यांना मिळू शकली नाही. ती रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून त्यांना दिलासा द्यावा तसेच ही मदत शेतकऱ्यांना वेळेवर न मिळण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यावर कडक स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशा मागणीची निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी नेते शैलेश सरकटे, जीवन घायाळ, प्रवीण देशमुख, रवी हाडे, प्रकाश मुंडे, धीरज मोरे, विजय मोरे सह तालुक्यातील अनेक गावातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.