* पत्नी, मुलीसह वाचविण्यासाठी गेलेल्या तरूणाचाही मृत्यू
* पती व एक युवक जखमी
देऊळगाव राजा : (एशिया मंच वृत्त)
शाळेला सुटी असल्याने पत्नीला कार शिकविणे सुरू होते. या दरम्यान कार शिकवित असताना कारवरील पत्नीचे नियंत्रण सुटले अन् कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत जावून कोसळली. यात पत्नी व मुलीचा मृत्यू झाला असून पतीला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तर शोधकार्य करणारा पवन पिंपळे या युवकाने महिला व मुलीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली मात्र विहिरीतील गाळात अडकल्याने त्याचा ही मृत्यू झाल्याने घटनेतील मृतकांची संख्या तिन झाली आहे. तर शिक्षक अमोल मुरकुट हा या घटनेतून बचावला असून तो गंभीर जखमी झाला आहे. विहिरीत पडलेल्यांना वाचविण्यासाठी उडी मारणारा ज्ञानेश्वर शिंगणे नामक युवक या घटनेत गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना देऊळगाव राजा येथे ३ नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी साडेबारा वाजे दरम्यान घडली. अधिक वृत्त असे कि, स्थानिक रामनगर मधील रहिवासी शिक्षक अमोल मुरकुट हे पत्नी स्वाती मुरकुट हिला कार शिकवत होते. त्यांच्यासोबत त्यांची बारा वर्षांची मुलगी सिद्धी मुरकुट ही सुद्धा होती. दरम्यान कार शिकवित चिखली रोडवर जात असताना पत्नी स्वाती मुरकुट हिचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या 70 फुट खोल विहिरीमध्ये कोसळली. कार कोसळण्याचा आवाज एैकताचं आजुबाजूच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून विहिरीत कोसळलेल्या कार ला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या अपघातात अमोल मुरकुट खिडकीमधून कसेबसे बाहेर आले. मात्र स्वाती मुरकुट व मुलगी सिद्धी मुरकुट यांचा मात्र पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. अमोल मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्वाती मुरकुट व सिद्धी यांचा मृतदेह सायंकाळी सहा वाजेपर्यंत विहिरीच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन वाहन, पोलीस ताफा दाखल झाले आहेत. सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
