जैन दिगंबर मुनीश्रींचा पिच्छिका परिवर्तन सोहळा !* शोभायात्रेनंतर तिरुपती मंगल कार्यालयात कार्यक्रम

जैन दिगंबर मुनीश्रींचा  पिच्छिका परिवर्तन सोहळा !
* शोभायात्रेनंतर तिरुपती मंगल कार्यालयात कार्यक्रम
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
         येथील चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात चतुर्मास असलेल्या मुनी श्री प्रयोग सागर जी महाराज व मुनी श्री प्रबोध सागर जी महाराजांचा पिच्छिका परिवर्तन सोहळा शनिवारी 29 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
        दिगंबर जैन महामुनीराज आचार्य श्री विद्यासागर जी महाराजांचे शिष्य असलेल्या प्रयोग सागर जी व प्रबोध सागर जी यांचा चातुर्मास येथील चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर महावीर नगर येथे सुरू आहे. या चातुर्मासातील महत्त्वाच्या धार्मिक विधी म्हणजे पिच्छिका परिवर्तन सोहळा होय. हा सोहळा चातुर्मासातील महत्त्वाचा व समाप्तीचा सोहळा असतो.
 गेले चार महिने उपरोक्त दोन्ही महाराज श्रींचा सहवास, प्रवचन, मार्गदर्शन, धार्मिक चर्चा आदींनी उत्साहात संपन्न होत आहे. सकाळी ७:३० वाजता अभिषेक शांती धारा, ८:३० ते ९:३० प्रवचन, त्यानंतर आहार दान होईल.
 पिच्छिका परिवर्तनाची शोभायात्रा दुपारी १:३० वाजता महावीर नगर मधील दिगंबर जैन मंदिरापासून सुरू होईल. येथील तिरुपती मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
        बाहेरगावाहून आलेल्या भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमाला सर्व धर्मबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.