भविष्याचा वेध घेत राष्ट्रवादी करणार शिर्डीत मंथन* डॉ.राजेंद्र शिंगणे यांची पत्रकार परिषदेत दिली माहिती

भविष्याचा वेध घेत राष्ट्रवादी करणार शिर्डीत मंथन
* डॉ.राजेंद्र शिंगणे यांची पत्रकार परिषदेत दिली माहिती
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      प्रदेश राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने ४ आणि ५ नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वर्तमान स्थिती संदर्भातील आकलन वाढावे, भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे आणि राष्ट्र तसेच समाजाबद्दलची बांधिलकी भक्कम व्हावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री आ. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 
            राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा या शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार , विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासक मार्गदर्शन करणार असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वाटचाल करणा-या पक्षाने २३ वर्षांच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा प्रमाण मानून राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाटचाल दमदारपणे सुरू आहे. महाराष्ट्रातील सुजाण आणि परिवर्तनशील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठबळ दिले. अलीकडच्या काळामध्ये भक्कम संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचे सांगून २३ वर्षांच्या प्रवासातील साडेसतरा वर्षे पक्ष राज्याच्या सत्तेमध्ये राहिला. समविचारी पक्षांना सोबत घेऊन वैचारिक लढाई पक्षाने लढली. हीच परंपरा अधिक व्यापक आणि गतिमान करण्यासाठी शिर्डी येथे राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा या अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, जेष्ठ नेते ऍड. साहेबराव सरदार, अतुल लोखंडे जिल्हा संघटक, महिला अध्यक्षा सौ. अनुजा सावळे, विधानसभा अध्यक्ष नरेश शेळके, तालुका अध्यक्ष डी. एस. लहाने उपस्थित होते.