चिखली : (एशिया मंच वृत्त)
महामार्गावर रस्त्याच्या कडेला बेजबाबदारपणे उभ्या केलेल्या ट्रकने एका दुचाकीस्वाराचा नाहक बळी घेतल्याची घटना चिखली-देऊळगाव राजा मार्गावरील मलगी फाटा जवळ 28 ऑक्टोबरच्या रात्री 9 वाजेच्या सुमार घडली . यामध्ये तालुक्यातील मुरादपूर येथील प्रकाश बिदेसिंग गाडेकर ( 40) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातातील मृतक प्रकाश गाडेकर हे चिखली येथील नाना खेडेकर यांच्या दुकानात कामाला होते. मुरादपूर येथून ते नियमितपणे ये-जा करीत होते. दरम्यान 28 ऑक्टोबरला सायंकाळी दुकान बंद झाल्यानंतर मुरादपूर या आपल्या गावाकडे दुचाकीने जात होते. दरम्यान मलगी फाटा जवळ टाटा आयशर क्रमांक एमएच 22 एए 1762 या वाहनाच्या चालकाने ट्रक रोडच्या डाव्या लेनमध्ये बेजबाबदारपणे उभे केले होते. या वाहनाचे पार्कींग लाईट देखील बंद ठेवले व पाठीमागून ये-जा वाहनांना धोक्याचे सूचना देणारे रेडियम किंवा इतर व्यवस्था देखील नसल्याने पाठीमागून दुचाकीवरून येणारे प्रकाश गाडेकर यांना रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाचा अंदाज आला नाही. परिणामी त्यांची मोटरसायकल पाठीमागून आयशरला जोरदारपणे धडकली. यामध्ये दुचाकीस्वार प्रकाश गाडेकर यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मृतदेह रुग्णालयात हलविला. याप्रकरणी विजयसिंग गाडेकर यांच्या फिर्यादीवरून आयशर चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
