इंडियन आयडॉल फेम राहुल खरेंच्या स्वरांनी श्रोते मंत्रमुग्ध* पाडवा पहाट : राजर्षी शाहु परिवाराचा उपक्रम

इंडियन आयडॉल फेम राहुल खरेंच्या स्वरांनी श्रोते मंत्रमुग्ध
* पाडवा पहाट : राजर्षी शाहु परिवाराचा उपक्रम 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       राजर्षी शाहू परिवाराच्यावतीने जिल्ह्यात प्रथमच आयोजित भक्तीगगीतांचा पाडवा पहाट कार्यक्रम रंगला. इंडियन आयडॉल फेम राहुल खरे यांच्या मंजुळ स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. वरवंड येथील वसंतराव नाईक धान्य गोदाम येथे २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या या संगीतमय कार्यक्रमास रसिकांनी भरभरुन दाद दिली. 
        कार्यक्रमाला राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, अभिता कंपनीचे सीईओ सुनिल शेळके, काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, क्षितिज फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा स्नेहल कदम, डॉ. माधवी जवरे, डोंगरखंडाळाचे उपसरपंच श्याम पाटील सावळे, सेवा संकल्प परिवाराचे डॉ. नंदू पालवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
        प्रास्ताविकातून संदीपदादा शेळके यांनी कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका विषद केली. येणाऱ्या काळात वरवंड येथील वसंतराव नाईक धान्य गोदाम परिसर सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून विकसित करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. जयश्रीताई शेळके यांनी गायक राहुल खरे यांच्या गितगायनाचे व त्यांच्या टीमच्या संगीत कौशल्याचे कौतुक केले. तसेच संत तुकाराम यांच्या अभंगातील ओळी सादर करीत आपली संत साहित्याबद्दलची गोडी दर्शवली. कार्यक्रमाचे संचालन शैलेशकुमार काकडे यांनी केले. 
गीतांनी आणली रंगत
         ‘माझे माहेर पंढरी', ‘खेळ मांडला’, 'तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची', 'भेटला विठ्ठल माझा', 'गर्जा महाराष्ट्र माझा' अशा एकाहून एक गीतांसह 'मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव' हा संत तुकडोजी महाराजांचा अभंग सादर केला. वेळेवर रसिकांनी मागणी केलेली गीतेही त्यांनी सादर केली. तबला साथ कृष्णा अहेर यांनी दिली. बासरी वादन सतीश जोगदंड, पखवाद वादन संतोष सोळंके यांनी केले तर प्रा. राधाकृष्ण अकोलकर महाराज यांनी सुत्रसंचालन केले. भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.