* डोंगरखंडाळा येथे कीर्तनातून दिला समाजप्रबोधनाचा संदेश
बुलडाणा: (एशिया मंच वृत्त)
ईश्वराची अनेक रुपे आहेत. आपापल्या श्रद्धेनुसार ईश्वराचे अस्तित्व आहे. मात्र ईश्वराचे खरे रुप आई- वडिल आहेत. आई -वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असे प्रतिपादन हभप ज्ञानेश्वर महाराज शेलुदकर यांनी केले.
डोंगरखंडाळा येथील संभाजीराजे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. बळीराम पाटील सावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त २२ ऑक्टोबर रोजी आयोजित कीर्तनातून त्यांनी हा उपदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक होते. माजी आमदार धृपतराव सावळे, राजर्षी शाहू पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके, राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके, वकील संघाचे अध्यक्ष विजय सावळे, जि.प सदस्या सविताताई बाहेकर, नगरचे उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे, पोलीस उपनिरीक्षक अनिल सावळे, कर निरीक्षक संजय कोगदे, सरपंच बबन गाडगे, उपसरपंच श्याम पाटील सावळे तसेच संभाजीराजे शिक्षण संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते.
पुढे बोलतांना माऊली महाराज म्हणाले की, आईच्या प्रेमाला तोड नाही. आईबद्दल सर्वच भरभरुन बोलतात. मात्र त्याचवेळी वडिलांचे कर्तव्य सुद्धा विसरणे शक्य नाही. वृद्धाश्रमांच्या वाढलेल्या संख्येबद्दल माऊलींनी चिंता व्यक्त केली. कै. बळीराम पाटील हे दुरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले. कै. देवकिसनजी चांडक, कै. आनंदा पाटील, कै. भावसिंग पाटील, कै. नामदेव पाटील, कै. श्रीराम गावडे, कै. सोनाजी जेऊघाले, शेषराव बारीकराव सावळे, प्रल्हाद पाटील यांना सोबत घेऊन गावात संभाजी राजे शिक्षण संस्था सुरु केली. आज परिसरातील मुले या शाळेत शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी कै. बळीराम पाटील झटले.
राधेश्याम चांडक यांनी कै. बळीराम सावळे पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. माजी आमदार धृपतराव सावळे म्हणाले की, कै. बळीराम सावळे पाटील यांनी स्थापना केलेल्या शिक्षण संस्थेमुळे डोंगरखंडाळा व परिसरातील खेड्यातील मुलांना शिक्षण घेता आले. या संस्थेतून अनेक अधिकारी तयार झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी कै. बळीराम सावळे पाटील यांना आदरांजली अर्पण केली. संदीपदादा शेळके यांनी बळीराम पाटील यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याचा गौरव केला. संभाजीराजे शिक्षण संस्थेच्या सर्व संचालकांचा यावेळी शाल, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. संचलन शैलेशकुमार काकडे यांनी केले.
