* प्रतिष्ठाणे बंद ठेवून रस्त्यावरचं केले ठिय्या आंदोलन
चिखली : (एशिया मंच वृत्त)
शहरातील डीपी रोड व पारधी बाबा रोड परिसरातील अतिक्रमण डोकेदुखी ठरत असून स्थानिक मालमत्ताधारक व व्यापाऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत असून वारंवार याबाबत प्रशासनाला तक्रारी देऊनही काही उपाय होत नसल्याचे सांगत येथील सर्व छोटे मोठे व्यापाऱ्यांनी 20 सप्टेबर 2022 रोजी सकाळ पासूनच आप-आपली प्रतिष्ठाणे बंद ठेऊन रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.
या संदर्भात 16 सप्टेंबर रोजी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हंटले होते की, शहरातील अत्यंत गजबजलेल्या डी. पी. रोडवरिल मालमत्ताधारक नियमितपणे नगरपरिषदेला मालमत्ता कर भरून सहकार्य करीत आहोत. मात्र त्याबदल्यात नगर पालिका प्रशासनाकडून आम्हाला काहीच सहकार्य मिळत नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. या मुख्य रस्त्याने सर्व शासकीय कार्यालये, पोलीस स्टेशन, दवाखाने असून हे नेहमीच वर्दळीचे ठिकाण आहे. यामुळे व्यापाऱ्यांवर विपरीत परिणाम होत आहे. सदर अतिक्रमण कायमस्वरूपी हटवावे अशी विनंती व्यापाऱ्यांनी केली आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ बनलेल्या डीपी रोडवर चिखली लगतच्या ग्रामीण भागातील शेतकरी आपला भाजीपाला सरळ बाजारात येऊन विकतात. वाढते शहरीकरण व लोकसंख्या यामुळे हा परिसर अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असून अतिक्रमण हटविल्यास त्यांच्या हातावरील पोटावर मार बसणार असेही सांगण्यात येत असून या सर्वांसाठी पर्यायी व्यवस्था प्रशासनाने करावी अशी मागणी सुद्धा होत आहे. मुख्य म्हणजे नगरपरिषदेने भाजी बाजार मध्ये गाळे बांधून भाजी विक्रेत्यांना दिलेले आहे.परंतु या गाळे धारकांपैकी अनेकांनी आपले गाळे अन्य व्यवसायांसाठी ते भाड्याने देऊन स्वतः आपली भाजी विक्रीची दुकाने याच डीपी रोडवर थाटलेली आहे; अश्या लोकांविरुद्धही कारवाई होणे अपेक्षित असल्याचे काही व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले.