बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्या प्रकरणी चिखली तालुक्यातील आमोना येथील आरोपी विष्णु भोसले यास जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.एन. मेहरे यांनी दहा वर्षाचा कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल मा. न्यायधिश यांनी 19 सप्टेबर 2022 रोजी दिला.
या प्रकरणाची माहिती अशी की, एका अल्पवयीन 16 वर्षीय बालिकेच्या वडिलांनी 22 एप्रील 2017 रोजी अंढेरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, त्यांची मुलगी पिडिता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शाळेतून घरी पोहचली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे शोधा-शोध केली असता ती मिळून आली नाही. त्याचवेळी त्यांना कळले की त्यांच्या गावातील विष्णु रामकिसन भोसले हा सुध्दा गावात नाही. वडिलांनी मुलीच्या मोबाईलवर संपर्क केला असता तो फोन विष्णु याने उचलला. व तुमच्या मुलीला पळवून आणले आहे असे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी त्याचा शोध घेवून त्याला अटक केली. तपासादरम्यान आरोपीला या कामात त्याचा मित्र कल्याण आटोळे याने मदत केल्याचे पुढे आले. आरोपी विष्णु भोसले याने औरंगाबाद येथे पिडितेवर दोन दिवस बलात्कार केल्याचे पुढे आले. याप्रकरणी पोलीसांनी आरोपी विरूध्द भादंविचे कलम 376 (2) जे, 363, 366 अ सह कलम 34 व पोस्को कायदयाचे कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून तपासाअंती विदयमान न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. सदर प्रकरणात फिर्यादी पक्षाकडून 8 साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. यामध्ये वैदयकिय अधिकारी डॉ.एच.आर.भगत, तपास अधिकारी पोउपनि संतोष जंजाळ यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड.अनंत केसाळे यांनी प्रभावी युक्तीवाद केला. त्यांचा युक्तीवाद आणि साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायधिश मेहरे यांनी आरोपी विष्णु भोसले यास दहा वर्षाचा कारावास व एक हजार रूपये दंड, व अपहरण केल्याप्रकरणी पाच वर्षाचा कारावास व एक हजार रूपये दंड, आणि दुसरा आरोपी कल्याण आटोळे यास पाच वर्ष कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.