पत्रकार कल्याण निधी उभारण्यासाठी जिल्ह्या- जिल्ह्यांत 'चॅरिटी शो 'ची गरज* अनिल म्हस्के यांची संकल्पना

पत्रकार कल्याण निधी उभारण्यासाठी जिल्ह्या- जिल्ह्यांत 'चॅरिटी शो 'ची गरज
* अनिल म्हस्के यांची संकल्पना
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      आपला कोणताही आर्थिक स्वार्थ न साधता लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा घटक असलेला पत्रकार जनतेच्या हक्कासाठी आपली लेखणी झिजवतो. पायाला भोवरा लावून सत्य शोधत हिंडून अप्रत्यक्ष समाजसेवा करत असतो. मात्र, तो स्वतःचे भवितव्य आणि कुटुंबीयांना विसरतो. अनेक संकटांना तोंड देणारे पत्रकारबांधव सगळीकडूनच उपेक्षित राहतात. शासनही त्यांच्यासाठी ठोस असे काहीच करत नाही. सरकारी घटकांवर विसंबून न राहता पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणार्थ पत्रकार कल्याण निधी उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात चॅरिटी  शो घेणे गरजेचे आहे, असे मत अनिल म्हस्के  यांनी व्यक्त केले.
       पत्रकारांच्या कल्याणार्थ असलेली संकल्पना विशद करताना अनिल म्हस्के म्हणाले, पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी 'चॅरिटी शो' हे एक उत्तम माध्यम ठरू शकते. दरवर्षी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून त्याद्वारेच 'मदत बँक' हा उपक्रमही राबवला जावू शकतो. हा मोठा आर्थिक स्त्रोत उत्पन्न करण्यासाठी पत्रकारांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. यातून पत्रकार व कुटुंबीयांच्या हिताचे उपक्रम राबविणे सोपे होईल. जमा होणाऱ्या रकमेच्या व्याजातून या सर्व गोष्टी शक्य होत राहतील आणि 'चॅरिटी शो'च्या माध्यमातून जमा होणाऱ्या 'पत्रकार कल्याण निधीतून अडल्यानडल्या संपादकापासून ते गावाकडच्या वार्ताहर, प्रतिनिधीला तत्काळ मदतीचा हात पुढे करण्यास मदत होऊ शकते.

पत्रकारांच्या पाठीशी
      दुर्दैवाने एखाद्या पत्रकाराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात मिळायला हवा. स्वतः पत्रकार अथवा त्याच्या घरातील कोणी सदस्य दुर्धर आजाराने पीडित असेल, तर त्यांच्या औषधोपचाराच्या खर्चाचा भार उचलता यावा. पत्रकारांच्या गुणवंत पाल्याला त्याच्या उज्वल शैक्षणिक भवितव्याकरिता संघटनेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती चालू करता यावी. पाल्यांना प्रोत्साहन देण्याकरिता सत्कार समारंभ घेता यावा. आरोग्य शिबिरांसह अन्य हिताच्या बाबी साध्य करण्यासाठी आपण पत्रकारांच्या पाठीशी आर्थिक पाठबळ उभे करणार असल्याची ग्वाही अनिल म्हस्के यांनी दिली.