सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त वैचारिक मंथन* सत्यशोधकीय वारसा ताकदीने पुढे नेण्याची गरज---संजय खांडवे

सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त वैचारिक मंथन
* सत्यशोधकीय वारसा ताकदीने पुढे नेण्याची गरज---संजय खांडवे
बुलढाणा :  (एशिया मंच वृत्त)
        शेतातील पिक जोमदार येण्यासाठी पिकातील तन काढले तर ‘धन’ हाती येते. अन्यथा तनच धन खाऊन टाकते. महात्मा ज्योतीबा फुलेंनी हयातभर धार्मिक ,सामाजिक, माजलेले स्तोम कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सत्यशोधनाची भुमिका स्विकारुन सत्यशोधक समाज स्थापन केला. त्यांच्या विचारांचा प्रभाव एवढा मजबूत होता की, पुढे आम्हाला राजर्षी शाहु महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, ताराबाई शिंदे, पंढरीनाथ पाटील सारखे वैचारिक पुरुष मिळाले. हिच परंपरा पुढे नेन्यासाठी सत्यशोधक वारसा पुढे चालविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा.संजय खांडवे यांनी केले.
       सत्यशोधक समाज स्थापनेला १५० वर्ष पूर्ण होत असल्याने तसेच दलीतमित्र माजी खा.पंढरीनाथ पाटील जयंती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या  राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून डॉ.खासबागे हॉस्पिटल येथे कार्यक्रमाचे आयोजन  २४ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सत्यशोधक माधवराव हुडेकर होते. तर शाहिनाताई पठाण, विजयाताई काकडे, गणेश निकम, डॉ.राजेश्वर उबरहंडे, सौ.अनिता कापरे, शालिनी बुंधे, गणेश उबरहंडे, सोहम घाडगे, दिपक मोरे, आशिष खासबागे, प्रेम खासबागे, कडूबा सोनुने आदी उपस्थित होते. 
        पुढे बोलतांना संजय खांडवे यांनी महात्मा फुले   यांचे कार्य मांडून सत्यशोधकीय विचारांची गरज का आहे? यावर प्रकाश टाकला. बुरसटलेल्या धार्मिक संकल्पना जेव्हा सर्वसामान्यांना अडचणीच्या ठरुन शोषणास हातभार लावू लागल्या तेव्हा फुले  दाम्पत्याने धार्मिक ठेकेदारांविरुध्द संघर्ष केला. का? म्हणून प्रश्न उपस्थित केले. संपासारखे हत्यार महात्मा फुलेंनीच आपल्याला दिल्याचे सांगून त्याकाळी झालेला न्हाव्याचा संप म्हणजे कामगार चळवळीचे बीज आहे, असे सांगितले. संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, पंढरीनाथ पाटील हे  फुल्यांच्या  विचारांना वाहक ठरले.आज सत्यशोधकीय विचारांना ताकदीने पुढे नेण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.

शिक्षीतांनो सत्यशोधन करा-डॉ.खासबागे 
   शिक्षीत झाला म्हणजे ज्ञानी झाला असे समजले जाते. परंतू हे तथाकथीत ज्ञानी लोकच कर्मकांडात जास्त अडकत असल्याचे डॉ.आशिष खासबागे यांनी सांगून सत्यशोधन म्हणजे वैज्ञानिक दृष्टी विकसित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी शाहिनाताई पठाण, विजयाताई काकडे, अनिता कापरे, गणेश निकम, डॉ.राजेस्वर उबरहंडे यांनीही विचार व्यक्त केले.       कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव हुडेकर यांनी जिल्ह्यातील सत्यशोधकांची परंपरा मांडून हे विचार तेवत ठेवा असे आवाहन केले. प्रास्ताविक प्रेम खासबागे यांनी करुन धर्मसत्ता व शोषण यावर प्रभावी भाष्य केले.