पाईपलाईनसाठी रस्त्याचे खोदकाम; नागरिकांचे पाण्यासाठी हाल

पाईपलाईनसाठी रस्त्याचे खोदकाम;  नागरिकांचे पाण्यासाठी हाल
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
         गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक इकबाल नगरमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विविध ठिकाणी पक्क्या सडकेचे खोदकाम करण्यात आले असून, या खोदकामामुळे अनेक ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांना नळाव्दारे होणारा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने इकबाल नगर वासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत. बुलढाणा नगर पालिका प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने तसेच ठेकेदाराची मनमानी वाढल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
      इकबाल नगर ते मिर्झा  नगर जाणाऱ्या रस्त्यावर पाईप लाईन टाकण्यासाठी ठेकेदाराने जेसीबीच्या सहायाने रस्त्याचे खोदकाम करून ठेवले आहे. यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या नळाचे पाईप क्षतीग्रस्त झाल्याने वार्डातील शंभर ते दिडशे नळाचे कनेक्शन तुटले आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी नळाव्दारे मिळत नाही त्यामुळे या परिसरात कृत्रीम पाणी टंचाई सोसावी लागत आहे. खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे एखादी मोठी  दुर्घटना या ठिकाणी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात वार्डातील नागरिकांशी चर्चा केली असता ते म्हणाले की, मागच्या दोन दिवसाआधी ठेकेदाराने जेसीबीच्या सहायाने खोदकाम करून ठेवले. यामध्ये वार्डातील अनेक नागरिकांचे नळ कनेक्शन कट झाले आहे. मात्र याकडे गंभीरतेने कुणीचं लोकप्रतिनिधी लक्ष दयायला तयार नाही. वार्डामध्ये साफ-सफाईसाठी कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यामुळे सर्वत्र घाण पसरलेली असून यामुळे वार्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.