जिजाऊ शाळेस जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार

जिजाऊ शाळेस जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार पळसखेड भट येथील जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला प्राप्त झाला आहे. सब कॅटेगरीमध्ये शाळेला फाईव्हस्टार रेटींग मिळाले. जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात १४ सप्टेंबर 2022  रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. 
         स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ अंतर्गत स्वच्छ विद्यालय जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन,गटशिक्षणाधिकारी पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिजाऊ ज्ञान मंदिरला पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, संस्थाध्यक्ष संदिपदादा शेळके यांनी शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सदर पुरस्कारासाठी संस्थाध्यक्ष संदीपदादा शेळके व केंद्रप्रमुख गडाख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
२२४० शाळांनी केले होते नामांकन दाखल
      स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी जिल्हाभरातील २२४० शाळांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी जिल्ह्यातील ४५ शाळांना विविध प्रकारात जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जिजाऊ ज्ञान मंदिर शाळेने कोरोनाकाळानंतरही आपली स्वच्छता मोहीम कायम ठेवली आहे. परिसर स्वच्छता, वर्गखोली स्वच्छता करण्यासह पिण्याचे शुद्ध पाणी, हँडवाश सेंटर आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.