राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले. स्वराज्य संकल्पनेची बी या मातेने आपल्या शिवरायांच्या मनामध्ये पेरली .त्यादृष्टीने बालपणापासून त्यांनी प्रयत्न केले. शिवरायांना ज्ञान, चरित्र, चातुर्य , संघटन, व्यवस्थापन, शस्त्रविद्या व पराक्रम अशा साहस व सत्त्वगुणाचे बाळकडू जिजाऊनी त्यांना दिले. त्यामुळे स्वराज्याचा आधारवड खऱ्या अर्थाने जिजाऊ मासाहेब आहेत. असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा चिखली तालुकाध्यक्ष प्रीतमकुमार मिसाळ यांनी व्यक्त केले.
बुधवार 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब यांच्या जयंतीनिमित्त चिखली येथील मेहकर फाटा येथे असलेल्या जिजाऊ मॉसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण भारतीय बौद्ध महासभा शाखा चिखली तालुक्याच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बुलडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते अनंता मिसाळ, सुरेश डवरे, सुखदेव गावंडे यांच्यासह तालुका कोषाध्यक्ष विजय मलवार, उपाध्यक्ष प्रकाश साळवे, पत्रकार संजय निकाळजे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी अनंता मिसाळ यांनी राष्ट्रमाता जिजाऊमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. जिजाऊ आदर्श माता असून जिजाऊ यांचे जीवन चरित्र अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले तर विजय मलवार यांनी जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, आत्मविश्वास, इच्छाशक्ती व गरीबाप्रती प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले असल्याचे सांगितले.यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन पत्रकार संजय निकाळजे यांनी केले. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते मेहकर फाटा परिसरातील व्यवसायिक कामगार व देऊळगाराजा तसेच मेहकर मार्गावरील प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
