दिशा फेडरेशनमध्ये सहभागासाठी बचतगटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दिशा फेडरेशनमध्ये सहभागासाठी बचतगटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
 बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांच्या मार्गदर्शनात दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनची यशस्वी वाटचाल सुरु आहे. पारदर्शक कारभार आणि उन्नतीचा मार्ग म्हणून फेडरेशनशी संलग्न होण्यासाठी बचतगटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 
       मागील काळात मोठ्या प्रमाणावर स्वयंसहाय्यता महिला बचत गटांची वाढ झाली. मात्र बहुतांशी बचत गटांचे मुख्य लक्ष्य हे स्वनिधीपेक्षा अनुदानावर केंद्रीत झाले. या अनुदान हव्यासापोटी खरी स्वयंसहाय्यता संकल्पना बाजूला पडली. अनुदानकेंद्रीपणामुळे बचत गटांचे बंद पडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. बचतगटांच्या विविध समस्या सोडवण्याच्या उद्देशाने जयश्रीताई शेळके यांनी दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनची स्थापना केली. ग्रामपातळीवर नवीन बचत गट स्थापन करणे, बंद पडलेल्या बचत गटांचे पुनरुज्जीवन करणे, बचत गट चालविण्याचे प्रशिक्षण, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, लघुद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन, उद्योग उभारण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन, उद्योगासाठी भांडवल उभारणे, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करणे ही कामे दिशा फेडरेशनच्या माध्यमातून केली जातात. 
     उत्तम व पारदर्शक कामकाज पाहता जिल्ह्यातील बचतगट मोठ्या संख्येने दिशा फेडरेशनसोबत जोडले जात आहेत. फेडरेशनकडून बचतगटांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. गतवेळी म्हणजे २०२० मध्ये दोन दिवसीय प्रदर्शन घेण्यात आले होते. त्यावेळी ५० बचतगट सहभागी झाले होते. त्यानंतर २०२१ मध्ये कोरोनामुळे प्रदर्शन आयोजित करता आले नाही. यावर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे प्रदर्शन घेण्यात येणार आहे. दरम्यान दिशा समन्वयकांकडून बचतगटांना प्रदर्शनाबाबत माहिती दिली जात आहे. गावोगावी जाऊन ही मंडळी महिलांच्या भेटी घेत आहेत. बचतगट प्रदर्शनात सहभागी होण्याचे त्यांना आवाहन करीत आहेत. सहभागी होणाऱ्या बचतगटांना कशा पद्धतीने फायदा होईल याविषयी सविस्तर विवेचन करीत आहेत. महिलांकडून प्रदर्शनात सहभागासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. 
बचतगटांच्या माहिलांमध्ये उत्सुकता : 
     कोरोनामुळे परिस्थिती खूप बदललीय. जवळपास दोन वर्ष कडक निर्बंध आणि नियमावलीत गेली. त्यामुळे लोकांच्या व्यवसायांवर परिणाम झाला. केंव्हा एकदाची परिस्थिती सुधारते आणि आर्थिक व्यवहार सुरळीत होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता परिस्थिती बरीच सुधारली आहे. निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे बचतगट प्रदर्शनाचे आयोजन करता येणे शक्य आहे. आपल्या मालास चांगली बाजारपेठ मिळेल अशी अपेक्षा महिला मंडळीस असल्याने त्यांना प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे. 
आपला स्टॉल बुक केला का? : 
     जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित बचतगट प्रदर्शनासाठी स्टॉल बुकिंग सुरु करण्यात आली आहे. खाली दिलेल्या ७६२०५३२८०३, ८६६८७११६७५ या क्रमांकावर बुकिंग करता येईल. आधी संपर्क करणाऱ्या बचतगटांना स्टॉल उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती दिशा फेडरेशनकडून देण्यात आली.