* सावित्रीबाई फुले जयंतीदिनी आयोजन
व्हीएसटीएफच्या वतीने तीन आदर्श शाळांना साहित्य वितरण
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून आज 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने ज्ञानोत्सव 2022 कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले. सदर कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या श्री. शिवाजी सभागृह येथे उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर जि.प उपाध्यक्ष सौ कमलताई जालींधर बुधवत, जि. प सदस्य रामभाऊ जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी प्राथमिक सचिन जगताप, डाएटचे अधिव्याख्याता धम्मरत्न वायवळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद गायकवाड, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, व्हिएसटीएफचे जिल्हा समन्वयक आनंद तिवारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले, राजमाता जिजाऊ यांच्या वेशभुषेत विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्याहस्ते कार्यक्रमाचे मान्यवरांनी दिपप्रज्वलन केले. कार्यक्रमावेळी विचार व्यक्त करताना उपाध्यक्ष श्रीमती बुधवत म्हणाल्या, व्हिएसटीएफच्या माध्यमातून जिल्ह्यातील तीन शाळा आदर्श होत आहे. अशाचप्रकारे जिल्ह्यातील इतरही शाळा आदर्श कराव्यात. सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण देण्यासाठी जे कष्ट उपसले, त्याचे स्मरण ठेवून मुलींनी शिक्षणात भरारी घ्यावी. तसेच जि.प सदस्य श्री. जाधव यावेळी म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी त्याकाळी खूप त्रास सहन केला. त्यामुळेच आज महिला शिक्षण घेवून प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. महिलांच्या कामगिरीने कुठलेही क्षेत्र सध्या सुटले नाही. शिक्षणाधिकारी श्री. मुकूंद म्हणाले, प्रत्येक महिलेने सावित्रीचा वसा जपताना शिक्षण घ्यावे. सध्या अनेक स्त्रीया केवळ माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण घेतात. मात्र अजूनही उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण कमी आहे. तरी ग्रामीण भागातील मुलींनी उच्च शिक्षण घेवून स्वत:च्या पायावर उभे रहावे.
nयावेळी इयत्ता 8 वी मधील विद्यार्थीनी कल्याणी ढवळे, कोमल तायडे, श्रद्धा लहाने, टाकळी विरोचे सरपंच नंदलाल उन्हाळे, मुख्याध्यापक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान व्हिएसटीएफच्यावतीने आदर्श शाळा सिंदखेड ता. मोताळा, करवंड ता. चिखली व टाकळी विरो ता. शेगांव येथील मुख्याध्यापक, सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांना शाळापयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, ग्रामसेवक, विद्यार्थी, शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सादरीकरण व संचलन आनंद तिवारी यांनी केले. आभार प्रदर्शन विलास बदक यांनी केले.