* अधीक्षक कृषी कार्यालयावर धडक : पीक नुकसान झाल्याचे शासनाला मान्य, मग विमा कंपनीलाच काय झाले? व्यवस्थापकाला विचारला जाब
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
गत काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 23 डिसेंबर रोजी धडक देऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह रिलायन्स पीकविमा कंपनीच्या व्यवस्थापकास धारेवर धरताच अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले. मात्र, अजूनही असंख्य शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या रविकांत तुपकर यांनी गुरुवारी पुन्हा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गाठून अधिकाऱ्यांसह वीमा कंपनीच्या व्यवस्थापकास जाब विचारला. विम्याची रक्कम तातडीने द्यावी; अन्यथा रिलायन्स पीकविमा कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयावर मोर्चा काढून शेतकऱ्यांची पै-पै वसूल करू, असा रोखठोक इशारा तुपकर यांनी यावेळी दिला.
विविध प्रकारच्या आस्मानी संकटामुळे पिकांची हानी झाली. सरकारने पंचनामे प्राप्त होताच शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली. मात्र, विमा कंपनी झालेले नुकसान मानालायच तयार नसल्याचे दिसत असल्याबद्दल रविकांत तुपकर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. मागील काळात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. विविध मागण्यांपैकी पीकविम्याचीदेखील एक प्रमुख मागणी त्यांनी रेटून धरली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्याचे आदेश दिले होते. यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. मात्र, रिलायन्स विमा कंपनी वठणीवर आल्याचे दिसत नसल्याने रविकांत तुपकर यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देऊन संताप व्यक्त केला. रिलायन्स विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक शर्मन कोडियात्तर यांना डांबून ठेवले. या आंदोलनाची धास्ती घेत आठ दिवसांत अनेक शेतकऱ्यांच्या बॅंकखात्यावर पीकविम्याचे पैसे जमा झाले. मात्र, अजूनही असंख्य शेतकरी हक्काच्या पैशांपासून वंचित आहेत. जेवढा विम्याचा हप्ता भरला, त्याच्या कितीतरी पटीने कमी रक्कम देऊन विमा कंपनीने काही शेतकऱ्यांची क्रूरथट्टा केली.
दरम्यान, रविकांत तुपकर यांनी गुरुवारी पुन्हा एकदा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देऊन कृषी उपसंचालक संजीवनी कणखर व रिलायन्स विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक शर्मन कोडियात्तर यांना धारेवर धरले. यावेळी शेतकऱ्यांच्या वैयक्तिक तक्रारी सादर करण्यात आल्या. या तक्रारींचा निपटारा करून शंभर टक्के पिकविम्याची रक्कम द्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी यावेळी रेटून धरली. विम्याची रक्कम न मिळाल्यास मुंबईच्या रिलायन्स पीकविमा कार्यालयावर मोर्चा काढून शेतकऱ्यांचा एकेक पैसा वसूल करवून घेऊ, असा इशारा तुपकर यांनी याप्रसंगी दिला.
यावेळी स्वभिमानीचे नेते शे.रफिक शे.करीम, नितीन राजपूत, छोटू झगरे, दिलीप वाघमारे, कैलास सोळंकी, गणेश वाघमारे, परमेश्वर सोळंकी, अमोल तोंडे, गणेश भोंगाडे, सुपाजी जुमडे व तक्रारकर्ते शेतकरी उपस्थित होते.