* आभासी पद्धतीने केले आयोजन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवकांच्या विविध कला गुणांना वाव देवुन, त्यांच्यातील सुप्त कला गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातुन प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे द्वारा दरवर्षी उपलब्ध करुन दिली जात असते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद यांचे विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 31 डिसेंबर 2021 रोजी आभासी पध्दतीने (ऑनलाईन) उत्सहात करण्यात आले.
जिल्हास्तरीय ऑनलाईन युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले. यावेळी क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, रविंद्र धारपवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, श्रीमती मनिषा ढोके तसेच परिक्षक म्हणून रविकिरण टाकळकर, प्रशांत खाचणे, टिळक क्षिरसागर, प्रा.सुभाष मोरे उपस्थित होते. युवा महोत्सवामध्ये लोकगित व लोकनृत्य या प्रकारांमध्ये स्पर्धंकांनी सहभाग घेतला. यामध्ये अंतिम निकाल परिक्षकांनी सादर केल्यानुसार लोकगित या बाबीमध्ये जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा तर लोकनृत्यामध्ये गो.से. कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. प्रथम क्रमांकाने निवड झालेल्या स्पर्धंकाची विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड अमरावती येथे दि.04 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या विभागीय महोत्सवासाठी निवड झालेली आहे. विभागीय महोत्सव सुध्दा ऑनलाईन पध्दतीने होणार असून, प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांना लिंक प्राप्त झाल्यानंतर त्यांना सादरीकरण करावे लागेल.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संयोजक श्रीमती मनिषा ढोके, भास्कर घटाळे, रविंद्र धारपवार, अनिल इंगळे, विजय बोदडे, सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, भिमराव पवार, कृष्णा नरोटे यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.