बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी 7 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंत निधी गोळा केला जातो. देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राणार्पण केले अशा जवानांच्या कुटूंबियांच्या जीवनातील अडी अडचणी दुर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे, यासाठी या निधीचा उपयोग केला जातो. त्यानुसार शासनाने सन 2021-22 करीता जिल्ह्याला 53 लाख 38 हजार इतका इष्टांक दिला आहे. या निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
सशस्त्र सेना ध्वजदिन दिनाचे औचित्य साधून 7 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांना ध्वज लावून निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान उपस्थित होते. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे व आपले जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.
