* महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विकास महासंघाची मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
व्देष भावनेतून स्थानिक इकबाल नगरमधील नॅशनल उर्दू प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेवर बुलडोजर चालवून शाळा जमिनदोस्त केली. याप्रकरणी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियमांचा भंग करणा-या बुलडाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या विरूध्द कारवाई करावी. तसेच शाळेला न.प. अंतर्गत जागा उपलब्ध करून शाळेचे पुनर्वसन करावे, अन्यथा न.प. प्रशासनाविरूध्द आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विकास महासंघाचे राज्य अध्यक्ष म.रियाज अ.समद सौदागर यांनी दिला आहे.
या संदर्भात शिक्षण राज्यमंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांच्यासह जिल्हयाचे पालकमंत्री डा. राजेंद्र शिंगणेसह जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे कि, बुलडाणा न.प.च्या शेत सर्वे नंबर 74 अ व ब या ओपन स्पेसवर नॅशल उर्दू शाळेवर बुलडाणा न.प. मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी शैक्षणिक सत्र चालु असताना नियमबाहयरित्या शाळेप्रती असलेल्या व्देष भावनेतून बुलडोजर चालवून शाळा जमिनदोस्त केली. त्यामुळे शाळेत शिक्षण घेणारे 203 अल्पसंख्यांक विद्यार्थी उघडयावर आले असून त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने शाळेवर बुलडोजर फिरविल्याचे मुख्याधिकारी यांचे म्हणणे आहे. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशात शाळेचा नामोल्लेख नाही. वास्तविक पाहता नॅशनल उर्दू शाळा ज्या ओपन स्पेसमध्ये होती. ती जागा न.प. कडून ठराव पारित करून घेतलेली आहे तसेच 2024 पर्यंतचे भाडे ही भरलेले आहे. नॅशनल उर्दू शाळा शंभरटक्के अनुदानित असल्याने या शाळेला नियमाप्रमाणे स्थलांतरीत करणे, शिक्षकांचे समायोजन करणे आदी बरेचं पर्याय असताना केवळ अल्पसंख्यांक नागरिकांविषयीची व्देष भावना मेंदूत भरलेल्या मुख्याधिकाऱ्याने ही कारवाई केली असल्याचा आरोप ही निवेदनात केला आहे. त्यामुळे संबंधित मुख्याधिकाऱ्याविरूध्द कारवाई करावी अन्यथा प्रशासनाविरूध्द तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.