महिलांसाठी कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करणार * डॉ. शबनम शेख यांचे प्रतिपादन

महिलांसाठी कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करणार 
* डॉ. शबनम शेख  यांचे प्रतिपादन
शेगाव : (एशिया मंच वृत्त)
      बहुतेक महिलांना कायद्याची जाणीव नसल्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध त्या आवाज उठवू शकत नाहीत. महिलांना कायद्याने दिलेल्या अधिकाराची माहिती व्हावी, यासाठी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने महिलांसाठी मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे ,असे प्रतिपादन राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष व महिला चिकित्सक डॉ. शबनम शेख यांनी केले.
       २६ नोव्हेंबर पासून २ डिसेंबर पर्यंत संविधान दिन व महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी दिनानिमित्त महिला अधिकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. या सप्ताहादरम्यान राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य निदान शिबिर, नेत्र तपासणी शिबीर, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्तन कॅन्सर तपासणी शिबिर, आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या सप्ताह दरम्यान महिलांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट नाट्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. चंदाताई फोकमारे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची तर मंगला सोळंके यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका सादर केली होती. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष माधुरी मोहन शर्मा यांनी सांगितले की, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांना विनावेतन निशुल्क शिकविले. शोषित पीडितांसह सर्व जातीतील स्त्रियांना स्वताचे पैसे खर्च करून शिकविले. एवढेच नव्हे तर त्यांनी खेड्यापाड्यात अनेक शाळांची सुरुवात केली. सुन आणि लुलिया मिरजेत धर्म व्यवस्थेवर आघात करून सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना शिक्षणाची प्रेरणा दिली. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून महिलांना सर्व क्षेत्रात प्रगती करण्याचे अधिकार प्रदान केले. राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना अशा महान देशभक्तांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे कार्य करीत राहणार असे त्यांनी सांगीतले. कार्यक्रमाला डॉ. शबनम शेख, माधुरी शर्मा, रूपाली वानखडे, मंगला सोळंके, सौ. अर्चना पवार, राजकन्या रेवस्कार, सरस्वतीबाई काकड, नर्मदाबाई वानखडे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.