* प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय अंभोरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
आंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य चक्र प्राप्त मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याचे सुपुत्र वीर जवान ज्ञानेश्वर साबळे यांच्या कार्याचा गौरव म्हणून भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय अंभोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे इमेलद्वारे केली.
जिल्ह्यातील उंद्री येथील जवान ज्ञानेश्वर साबळे हे ११ मार्च २००६ मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाले. सध्या ते आंध्रप्रदेशमधील विजयवाडा येथील एनडीआरफच्या मुख्यालयात बटालियन १० मध्ये कार्यरत आहेत. यापूर्वी ते जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत होते. तेथे बारामुल्ला ठाण्याच्या कलहर क्षेत्रात नाका ड्युटीवर असतांना त्यांनी १९ ऑक्टोबर २०१८ रोजी दोन खतरनाक आतंकवाद्यांचा खात्मा केला होता. या अतुलनीय साहस व विरतेबद्दल २२ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्ली येथे साबळे यांचा शौर्य चक्र देऊन सन्मान करण्यात आला. साबळे यांच्या किर्तीमानाबद्दल मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला प्रथमच शौर्य चक्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. त्यांच्या अतुलनीय कार्याचा राज्य शासनाने गौरव केला पाहिजे. आंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवर अर्थ संकल्पात तरतूद करुन वीर जवान साबळे यांना प्रोत्साहनपर भरीव आर्थिक करण्याची मागणी विजय अंभोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
आंध्रप्रदेश सरकार अशी देते मदत
आंध्रप्रदेशचे रहिवासी असलेल्या व राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळालेल्या वीर जवानांना आंध्रप्रदेश सरकारकडून भरीव आर्थिक मदत देण्यात येते. परमवीर चक्र तथा अशोक चक्र प्राप्त जवानांना १ करोड रुपये, महावीर चक्र तथा कीर्ती चक्र प्राप्त जवानांना ८० लाख रुपये, वीर चक्र आणि शौर्य चक्र प्राप्त जवानांना ६० लाख रुपये इतकी भरीव आर्थिक मदत देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने मातृतीर्थ जिल्ह्याचे रहिवासी वीर जवान साबळे यांचा भरीव मदत देऊन गौरव करावा, अशी मागणी विजय अंभोरे यांनी केली.