* मुफ्ती अनीसुद्दीन अशरफी सरचिटणीस पदी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जमिअत उलेमा-ए-हिंद या सामाजिक संघटनेच्या बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवडणूक रविवारी शेगाव येथे पार पडली. त्यात सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. ज्यामध्ये हाफिज खलीलउल्लाह शेख यांची सहाव्यांदा बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी तर मुफ्ती मोहम्मद अनिसुद्दीन अशरफी यांची जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. शांतता पूर्ण वातावरणात बिनविरोध पार पडलेल्या या निवडणुकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जमीअत उलमा-ए-हिंद (मौलाना अरशद मदनी) ही संघटना समाजातील अन्यायग्रस्त, पीडित, शोषित तथा पूर आणि आगीमुळे सर्वस्व गमावलेल्या लोकांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. संघटनेची सभासद नोंदणी मोहीम बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात आली. शेगाव येथील अबुबकर मस्जिद मध्ये रविवारी जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. ज्यामध्ये जिल्हाभरातून जमीअतच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. निवडणूक प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी हाफिज खलीलउल्लाह शेख होते तर निरीक्षक म्हणून मुंबई येथील जमिअत उलेमा-ए-हिंदचे प्रतिनिधी मुफ्ती हफिजउल्लाह कासमी आणि कारी निसार अहमद निरीक्षक म्हणून हजर होते. यावेळी हाफिज खलीलउल्लाह शेख यांना सहाव्यांदा बुलडाणा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सर्वानुमते दिल्याने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. मौलाना अब्बास खान यांच्या सामूहिक प्रार्थनेने या निवडणूक सत्राची सांगता झाली.