बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षाचे औचित्याने बुलडाणा शहरात वामनदादा कर्डक साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले असल्याची माहिती साहित्य संमेलनाचे संयोजक रवींद्र साळवे यांनी दिली.
स्थानिक पत्रकार भवन येथे आज 13 डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या १३ फेब्रुवारी २०२२ रोजी स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात हे एक दिवशीय साहित्य संमेलन होणार आहे. वामनदादा यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हे अपूर्व असे अभिवादन ठरेल. वामनदादा कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतावादी विचार आपल्या ह्यातीत विविध गितांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच वामनदादा कर्डक यांचे जीवन कार्य देखील सर्वव्यापी होते. बुलडाणा जिल्हयाशी त्यांचा कायम ऋणानुबंध होता. म्हणूनच त्याच्या जन्मशताब्दी वर्षात या साहित्य संमलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वामनदादांच्या नावाने होणारे हे पहिलेच समेलन असून या समेलनासाठी राज्यभरातून यासाठी वक्ते, अभ्यासक, कवी व गायक यांना आमंत्रीत करण्यात येणार आहे. बुलडाणेकरांनी यापूर्वी झालेल्या प्रत्येक साहित्य संमेलनास उस्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. त्याप्रमाणे यापुढेही उस्फूर्त प्रतिसाद द्यावा व हे संमेलन यशस्वी करावे असे आवाहन सुरेश साबळे, सुरेश सरकटे, डी. आर. इंगळे, रमेश आराख, भाऊ भोजने व शशिकांत इंगळे व अमोल पैठणे यांनी केले आहे.
