नयनरम्य ज्ञानगंगा अभयारण्याला वर्षभरात पर्यटकांच्या भेटीने 13 लाखचे महसुल प्राप्त दे

नयनरम्य ज्ञानगंगा अभयारण्याला वर्षभरात पर्यटकांच्या भेटीने 13 लाखचे महसुल प्राप्त
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       शहरापासुन अवघ्या 12 किमी अंतरावर अजिंठा डोंगररांगामध्ये वसलेले ज्ञानगंगा अभयारण्य म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवाच आहे. 20 हजार  हेक्टर पेक्षा जास्त विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेले वनक्षेत्र, उंच डोंगर, खोल दऱ्या, दाट झाडी त्यामध्ये साग, अंजन, सालइ, खैर, मोईन इ. वृक्ष तसेच अनेक प्रकारचे गवतांचे प्रजाती सह बिबट, अस्वल, भेडकी, हरीण, निलगाय, रानडुक्कर मोर, ससा अनेक पक्ष्यांचा अधिवास हे या अभयारण्याचे वैशिष्ट्ये आहे.
 
     अभयारण्याचे उत्तरेचे व दक्षिणेचे टोकावर असलेले माटरगांव व पलढग धरणाचा विस्तीर्ण जलाशय पर्यटकांचे मन मोहित करून टाकतो. विस्तीर्ण गवती कुरणे, त्यामधुन कधी-कधी दिसणारी निलगाय, अस्वलांचे दर्शन पर्यटकांना मंत्रमुग्ध केल्या शिवाय राहत नाही. लाख्याचा झिरा, बोरबन, वानर कराड येथुन डोळयात भरनारे निसर्गाचे रूप अलौकीक आहे. अभयारण्याचे मधोमध वाहणाऱ्या ज्ञानगंगा नदीचे काशी नळकुंडावरून होणारे दर्शन तर स्वर्गीय आनंद देणारे आहे.
     या अभयारण्यात कोरोना नंतर 17 महिन्यामध्ये 9122 पर्यटकांना भेटी दिल्या आहेत. तर  13 लाख 2 हजार, 65 रुपये  निधी महसुल जमा झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे निर्देशांचे अधिन राहून वनपर्यटन सुरू करण्यांत आले असुन वन व वन्यजीवांचे संरक्षणामध्ये स्थानिकांचा सहभाग वाढणे, रोजगार निर्मीती व जनजागृती शिक्षणाबरोबर पर्यटकांना सोयीसुविधा सह संधी उपलब्ध करून देणे या वनपर्यटनाचा उद्देश आहे. सर्व पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन  वसंत साबळे सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) अकोला यांनी केले आहे.