बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
पाऊस येण्याबाबत निसर्ग देखील काही दिशानिर्देश देत असतो.परंपरागत ज्ञान देखील यात महत्त्वाच्या आहेत मात्र अलीकडच्या काळात पाऊस वाढला असून तापमानवाढीमुळे हे होत आहे. आगामी काळात शेतकरी बांधवांसह सर्वांना निसर्गाच्या प्रकोपापासून वाचायचे असेल तर प्रत्येकाने वृक्ष लागवडीवर भर द्यावा, असे कळकळीचे आवाहन हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटील यांनी केले. शिवसेनेच्या वतीने मासरूळ येथे २ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, शिवसेना तालुकाप्रमुख लखन गाडेकर, पंचायत समिती उपसभापती श्रीकांत पवार, सदस्य दिलीप सिनकर, शेषराव सावले, सुधाकर आघाव, राजू मुळे, समाधान बुधवत, रवि गोरे, विजय इतवारे, मधुकर महाले, अमोल शिंदे, दादाराव महाले, संदीप पालकर, देशमुख काका, मधुकर सिनकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंजाबराव डख पाटील म्हणाले की, उपग्रहचित्राचा अभ्यास करुन पावसासह अन्य हवामानाचा अंदाज आपल्याला सांगता येतो. स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव पावसाबाबतची माहिती देण्याचे काम मी सुरू केले आहे. सुरुवातीला काही लोकांना डख नावाची पंजाब राज्यातील कुठलीतरी संस्था असेल असं वाटायचं. मात्र नंतर ७०० व्हॉट्सऍप ग्रुप तयार करून शेतकऱ्यांना हवामानाबाबतची माहिती घरबसल्या विनामूल्य दिली जाते. या माध्यमातून थेट तीन कोटी शेतकऱ्यांशी आपण जोडले गेलो आहोत. शेतीचे नुकसान टाळण्यासाठी या महितीचा उपयोग करून घ्यावा,असे आवाहन हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केले आहे.
९० च्या दशकात च्या सुरुवातीला मुंबईला पाऊस आला की, तिसऱ्या दिवशी आपल्या भागात पाऊस पडतो असं लोक म्हणायचे आणि पेरणीची लगबग आटपून घ्यायचे. मात्र १९९५ नंतर कारखानदारी जागतिकीकरणसोबत वाढली. सोबतच सिमेंटचे जंगल देखील वाढत गेलं आणि परिणामी तापमानात देखील वाढ होत गेली. त्यामुळे निसर्गाचं चक्र बदलल्या सारखी स्थिती आहे. एक वेळ ओला दुष्काळ पवडतो मात्र कोरडा दुष्काळ पवडत नाही. जमिनीची धूप थांबवायचे असेल आणि निसर्गाच्या प्रकोपापासून वाचायचा असेल तर प्रत्येकाने एक झाड लावावे. प्रत्येक वाढदिवशी संकल्प घेऊन एक झाड जर लावले तर निश्चितच आगामी काळामध्ये त्याचा फायदा सर्वांना होईल असेही पंजाबराव डख म्हणाले.
उपग्रहचित्राचा अभ्यास करुन त्यातून पाऊस, थंडी, ऊन यांबाबत अचूक अंदाज करणे शक्य होत आहे. शेतकऱ्यांना याबाबतची माहिती कळावी, यासाठी व्हॉट्सऍप ग्रुप तयार करून, पावसाचा अंदाज दिला जातो. तो खरा ठरत असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास बसला. आभाळ लाल होणे, चिमण्या अंघोळ करणे, विद्युत प्रकाशाच्या उपकरणांवर किडे जमा होणे, आकाशात विमानाचा आवाज, या नैसर्गिक बाबींवरून, पाऊस येणे अथवा न येणे, याबाबत अंदाज बांधण्यास मोठी मदत होते. शेतकऱ्यांची शेती ही निसर्गाच्या पाऊसावर अवलंबून आहे. परंतु आजकाल पाऊसाची वेळ ही अनिश्चित असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. महाराष्ट्रात मान्सून कसा येतो, त्याचा प्रवास कसा असतो, चक्रीवादळ कसे निर्माण होते, पेरणी कधी करायची , मळणी कधी करायची या सर्व बाबींचे हवामानाचे अंदाज व मार्गदर्शन पंजाबराव डख यांनी उपस्थितांना केले.
खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकरी या नात्याने केलेले मार्गदर्शन उपस्थितांना वास्तवाचे भान देऊन गेले. शेती परवडत नसल्याचे आपण मुलांना लहानपणापासून सांगतो. त्यामुळे शिकली सवरलेली मुलं शेतीकडे दुय्यम दर्जा म्हणूनच पाहतात. मात्र बारमाही काम उपलब्ध करुन देणारी शेती एकमेव क्षेत्र आहे. त्यामुळे सकारात्मकता ठेवून नव्या प्रयोगांच्या आधारे शेती करण्यावर भर द्यावा, असे खासदार जाधव म्हणाले. शेतीला पूरक धंद्याची जोड देऊन हातभार लावावा. शिवसेना जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा तत्वाला जागूनच अशा स्वरूपातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते असे सांगितले. पंजाबराव यांच्या माध्यमातून अचूक अंदाज मिळत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये विश्वास वाढत आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचे आभार देखील मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाप्रवक्ता गजानन धांडे यांनी केले. यावेळी मासरूळ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तसेच मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमधील शेतकरी बांधव , शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
