अंडी उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल- संदीपदादा शेळके

अंडी उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल- संदीपदादा शेळके
 बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
    ग्रीन ऍग्रो बाजार कंपनीच्या माध्यमातून जिल्हा व जिल्ह्यालगत १०० शेडद्वारे प्रतिदिन तीन लाख अंड्यांचे उत्पादन घेतले जाते. दररोज १० लाख अंडी उत्पादित करुन जिल्ह्याला अंडा हब बनवण्याचा कंपनीचा मानस आहे. अंड्याची वाढती मागणी पाहता ही बाब सहज शक्य आहे. अंडी उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा ग्रीन ऍग्रो बाजार कंपनीचे कार्यकारी संचालक संदीपदादा शेळके यांनी व्यक्त केला. 
       जळगाव जामोद तालुक्यातील नागवेली या पहिल्या अंडी उत्पादन प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर रमेश ताडे, रमेशचंद्र घोलप, दत्ताभाऊ पाटील, डॉ. दलाल, तुकाराम काळपांडे, गजानन वाघ, डॉ. संदीप वाकेकर, मनोज वाघ, श्री. ठाकरे, अशोक ताडे, राजाभाऊ शिखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना संदीपदादा शेळके म्हणाले, ग्रीन ऍग्रो बाजार कंपनी व नागवेली अंडी उत्पादन प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिदिन चार हजार अंडी उत्पादन क्षमतेचे शेड तयार झाले आहे. अंड्यासाठी २० लाख अंडी साठवन क्षमतेचे कोल्ड स्टोअरेज ग्रीन ऍग्रो बाजार कंपनीने जिल्ह्यात उभारलेले आहे. त्यामधून शेतकऱ्यांना अंड्याच्या किमतीतील फरकाचा लाभ निश्चितच होणार आहे. नागवेली अंडी उत्पादन प्रकल्प घाटाखालील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविकात रमेश ताडे यांनी नागवेली अंडा उत्पादन प्रकल्प सुरु करण्यामागचा उद्देश सांगितला. सातपुड्याच्या पायथ्याशी सुरु केलेल्या या अंडा उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातून भूमिपुत्र असल्याचे उत्तरदायित्व पार पाडण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. इतर मान्यवरांची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.