मग्रारोहयो मजुरांची तब्बल पावणेपाच कोटींची मजुरी थकीत * उसनवारीवर साजरी करावी लागली दिवाळी * लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी


मग्रारोहयो मजुरांची तब्बल पावणेपाच कोटींची मजुरी थकीत
 *  उसनवारीवर साजरी करावी लागली दिवाळी   *     लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची         मागणी
जालना : ( विजय यादव  एशिया मंच वृत्त)
      बदनापूर तालुक्यातील हातावर पोट असलेल्या मग्रारोहयो मजुरांचे गेल्या दोन महिन्यांपासून मजुरीचे ४ कोटी ७२ लाख रुपये शासनाकडे थकलेले आहेत. दिवाळीसारख्या सणात मजुरी न मिळाल्याने या मजुरांना चक्क उसनवारीवर दिवाळी साजरी करावी लागली आहे.
     बदनापूर तालुक्यातील अकोला, अंबडगाव, अनवी राळा, आसरखेडा, अकोला, बदनापूर, बाजार वाहेगाव, बावणे पांगरी, भाकरवाडी, धनगरवाडी, भराडखेडा, भिलपुरी, बुटेगाव, चनेगाव, चिखली, दावलवाडी, डावरगाव, देवगाव तांडा, देव पिंपळगाव, ढासला, धामणगाव धोपटेश्वर, डोंगरगाव, दाभाडी, डोंगरगाव, सायगाव दाभाडी गेवराई बाजार, गोकुळवाडी, हालदोला, हिवरा दाभाडी, हिवरा राळा, जवसगाव, कडेगाव, काजळा, पानखेडा, कंडारी बुद्रुक, कंडारी खुर्द, कस्तुरवाडी, केळीगव्हाण व इतर गावांमध्ये ६३ कामे गेल्या दोन महिन्यात सुरू आहेत. यामध्ये वृक्षलागवड, घरकुल, सिंचन विहीर, फळबाग लागवड, अशा विविध कामांमध्ये एकूण ४९३ मग्रारोहयो मजुरांनी काम केलेले आहे. या मजुरांना २१ सप्टेंबर २०२१ नंतर शासनाकडून मजुरीचे ४ कोटी ७२ लाख रुपये मिळालेले नाहीत. मग्रारोहयोच्या कामावर अनेक शेतकरी शेतमजूर व बेरोजगार काम करतात. शासनाकडून मग्रारोहयोच्या मजुरांची मजुरी १५ दिवसांच्या आत देण्याचा नियम आहे; परंतु या तालुक्यातील मग्रारोहयोच्या मजुरांना गेल्या दोन महिन्यांपासून मजुरीचे पैसे मिळालेले नाहीत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुका १ कोटी १५ लाख, भोकरदन तालुका ५ कोटी ४६ लाख, घनसावंगी तालुका ३ कोटी ६ लाख, जाफराबाद तालुका १ कोटी ६९ लाख, जालना तालुका ८३ लाख, मंठा तालुका ४६ लाख, परतूर तालुका ४८ लाख याप्रमाणे मजुरांचे वेतन थकल्याचे सांगण्यात येते. तरी या सर्व बाबीकडे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देण्याची मागणी मजूर वर्गाकडून जोर धरत आहे.