* राज्य सरकारकडून तुपकरांना बैठकीचे निमंत्रण * उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी केली चर्चा
* डॉ.शिंगणेंची यशस्वी शिष्ठाई
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. राज्य सरकारने त्यांना बैठकीचे निमंत्रण दिले असून ना.अजितदादा पवार यांनी ना.डॉ.शिंगणे यांच्या माध्यमातून रविकांत तुपकर यांच्या मागण्या समजून घेतल्या. या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले आणि २४ नोव्हेंबर रोजी बुधवारी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक आयोजित केली असून यासाठी रविकांत तुपकर व राजू शेट्टी यांना आमंत्रीत केले आहे. तसेच मागण्याचा संबंधित मंत्री व सचिव हे ही याबैठकीला उपस्थित राहणार आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी देखील राजू शेट्टी यांना सोयाबीन पेंड आयात करणार नसल्याचे आश्वासन दिले असून लवकरच यासंदर्भातील आदेश काढू तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्यासोबत बैठकीत सोयाबीनरील पाच टक्के जीएसटी कमी करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते शरद पवार यांनी देखील रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा करुन केंद्रीय स्तरावर मागण्यांबाबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे. एकंदरीत राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतल्याने शेतकरी एकजुटीचा विजय झाल्याची प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून यशस्वी मध्यस्थी केली त्यांच्याहस्ते रविकांत तुकपर यांना ज्यूस पाजून अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असून तुपकरांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर गेल्या ३१ ऑक्टोबरपासून लढा देत आहेत. ३१ ऑक्टोबरला त्यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर रेकॉर्डब्रेक मोर्चा धडकला. त्यानंतर राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांनी पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा संयुक्तपणे दौरा करुन आंदोलन पुकारले. ११ नोव्हेंबर रोजी वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे कापूस - सोयाबीन परिषद पार पडली आणि राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात विदर्भ, मराठवाडाव्यापी आंदोलनाची घोषणा केली. त्यानंतर तुपकरांनी १७ नोव्हेंबर रोजी राज्याची उपराजधानी नागपूर येथील संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन सरु केले. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करुन नागपूर पोलिसांनी जबदरस्तीने तुपकरांना ताब्यात घेऊन पोलीसी बंदोबस्तात १८ नोव्हेंबरच्या सकाळी बुलडाण्यात आणून सोडले. मात्र तुपकरांनी त्यांच्या निवास्थानासमोरच आपले आंदोलन पुढे सुरु ठेवले. या दरम्यान रविकांत तुपकर यांची प्रकृती अधिक खालावली तर दुसरीकडे गावागावात सरकारविरोधात रोष निर्माण झाला, प्रभात फेरी, रास्तारोको आणि धरणे आंदोलनास सुरुवात केली. 'स्वाभिमानी'च्या शेख रफीक यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला परंतु त्यानंतर कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी चिखली रस्त्यावर उतरुन रास्तारोको केला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांत वाद उफाळून राडा निर्माण झाला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे वाहन तोडले, रुग्णवाहिकेवर देखील दगडफेक केली. तर रात्री उशीरा तहसीलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्नही झाला. २० नोव्हेंबर रोजी तुपकर यांच्या अन्नत्यागाचा चौथा दिवस होता त्यांची प्रकृती अधिक खराब होत चाचली होती तर आंदोलन अधिक पेटून जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी प्रशासकीय आणि राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झाले. दरम्यान पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मध्यस्थी केली. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या सुचनेवरुन ना. डॉ. शिंगणे सकाळीच आंदोलनस्थळी दाखल झाले. राज्य सरकारने तुपकरांना बैठकीचे निमंत्रण दिले. २४ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री ना. पवार यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह राज्याचे कृषी मंत्री ना. दादा भुसे, ना. छगन भुजबळ, ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासइ इतर मंत्री व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहे. राजू शेट्टी यांनाही या बैठकीचे निमंत्रण दिले जाणार आहे. या संदर्भात ना. डॉ. शिंगणे यांनी राज्य सरकारचे पत्र रविकांत तुपकर यांना दिले त्यामुळे अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले.
* फडणवीसांचा तुपकरांना फोन : राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजपाचे नेते देवेंद्र फडवणीस यांनीही तुपकरांशी फोनद्वारे चर्चा करुन केंद्रीय मंत्र्याकडे आपण स्वत: पाठपुरावा करु आणि बैठकीसाठी तुम्हाला दिल्ली घेऊन जाऊ, सदर आंदोलन थांबवा, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान यापूर्वीच शरद पवार यांच्याशी देखील फोनद्वारे चर्चा झाली होती. तसेच ना. बच्चू कडू, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवर, माजी मंत्री महादेवराव जानकर यांनीही फोनद्वारे तुपकरांशी संपर्क साधून चर्चा केली.
* हा शेतकरी एकजुटीचा विजय : अन्नत्याग आंदोलनाला मिळालेले यश हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे. शेतकऱ्यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. सोयाबीन पेंड आयातीबाबत स्वत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राजू शेट्टी यांना आश्वासन दिले, उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी आपल्याशी बोलून बहुतांश मागण्या मान्य करणार असल्याचे सांगत बैठकीचे निमंत्रण दिले. राजू शेट्टी यांनी दररोज फोनद्वारे संपर्क करुन प्रकृतीची विचारपूस करण्यासह केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला तसेच दररोज आंदोलनाला पाठबळ दिल्याचेही रविकांत तुपकरांनी सांगितले. दरम्यान तुपकरांनी शेतकरी, कार्यकर्ते व माध्यमांचे आभार माणले आहेत.
* विविध गुन्हे दाखल : १९ नोव्हेंबर रोजी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने अन्नत्याग आंदोलन चांगलेच चिघळले. दरम्यान शेख रफीक यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक होऊन रास्तारोको आणि तोडफोड झाल्याने पोलिसांनी रविकांत तुपकर, ॲड. शर्वरी तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात कलम १४३, १४७, १९४, १५१, १५२, १५४, १५५, १०९, ११४, २६९, २७०, ३३६, ३३७, ३४१, १८८ आयपीसी सहकलम ३ सार्वजनिक मालकत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा सहकलम १३५ मपोका १९५१ व सहकलम ५१ (ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व सहकलम ३ साथरोग प्रतिबंध कायदा महाराष्ट्र कोविड १९ प्रतिबंधक उपाययोजना सहकलम ११ सहकजम ७ फौजदारी सुधारणा कायदा २०१३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपोषण सोडतेवेळी केलेल्या भाषणात आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आपण स्वत: राज्याचे गृहमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. या आंदोलनादरम्यान रविकांत तुपकरांच्या घरासमोर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, कालपासून आंदोलनस्थळी प्रचंड तणावपूर्ण शांतता होती.
*दवाखाण्यात कार्यकर्त्यांची गर्दी : रविकांत तुपकर यांची प्रकृती खालवल्यामुळे अन्नत्याग आंदोलन स्थगित केल्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना ही बाब कळताच दवाखाण्यात कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली. दिवसभर कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे दवाखान्यात दाखल होत होते. तुपकरांची प्रकृती बघून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते. पोलिसांच्या वतीने दवाखान्यातही चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून डॉक्टर तुपकरांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत.
