चिखली उपजिल्हा रुग्णालय आता प्राणवायू स्वयंपूर्ण
* आमदार श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना यश
चिखली : (एशिया मंच वृत्त) येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ९० लाख रुपये किमतीच्या ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, या प्लांटची उभारणी पूर्ण झाल्याने आमदार श्वेता महाले यांनी नुकतीच पाहणी केली. तसेच चिखली उपजिल्हा रुग्णालय आता प्राणवायू बाबत स्वयंपूर्ण झाले आहे. त्यामुळे आता चिखली वासियांना प्राणवायूची कमतरता भासणार नसल्याने आमदार महाले यांनी समाधान व्यक्त केले. तसेच ऑक्सिजन प्लांटला मान्यता देऊन आमदार महाले यांना दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल त्यांनी चिखली वासीयांच्या वतीने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आभार मानले आहे.
तसेज या प्लांटसाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्या अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ऑक्सिजन मिळत नसल्याने चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करावी अशी मागणी आमदार महाले यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात समर्पित कोविड सेंटरला आमदार महाले यांच्या प्रयत्नाने मान्यता मिळाली. दरम्यान, जिल्ह्यातील खामगाव, देऊळगाव राजा व इतर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट चे काम सुरू झाले होते. परंतु चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय ऑक्सिजन संदर्भात स्वयंपूर्ण होत असताना चिखली येथे कोणते प्रकारचे ऑक्सिजन प्लांटला मान्यता न दिल्याने चिखली शहर परिसरातील नागरिकांवर तथा रुग्णांवर अन्याय केल्याची भावना निर्माण होत असल्याची बाब आमदार महालेंनी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे बोलून दाखवली. त्याचवेळी पालकमंत्री डॉ.शिंगणे यांनी चिखली येथे ऑक्सिजन प्लांट देण्याचे मान्य केले. त्या अनुषंगाने आमदार महाले यांचे प्रयत्नाने कोविड हेल्थ सेंटर आणि ऑक्सिजन प्लांट या दोन्ही कामांना मान्यता मिळाली.
तसेच चिखली शहराच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून दोनही कामे मैलाचा दगड ठरणार आहे. यावेळी डॉ. प्रतापसिंह राजपूत, रामदास देव्हडे,पंडित देशमुख, वजीरा बी शे अनिस, विजय नकवाल, नामु गुरुदासानी, सुभाष झगडे, गोविंद देव्हडे, अर्चना खबूतरे, संजय अतार, अनुप महाजन, शैलेश बाहेती, पंजाबराव धनवे, शैलेश सोनुने, घनश्याम बंग, रघुनाथ कुलकर्णी, सुदर्शन खरात, सागर पुरोहित उपस्थित होते.
दररोज ८० ते १२० जंबो सिलिंडरची निर्मिती :
चिखली येथे बसवण्यात येणारा ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा ५०० एलपीएम क्षमतेचा असून यातून दररोज ८० ते १२० जंबो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. ऑक्सिजन निर्मिती ही हवेतून होणार असल्याने किरकोळ खर्चातून दररोज मोठ्या प्रमाणात मोफत प्राणवायू मिळून रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
