बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
भारतातील प्रत्येक नागरिकाला कायद्याची तोंड ओळख असणे आवश्यक आहे. कायद्याची तोंड ओळख नसल्यास आपले अधिकार कळणार नाही म्हणून स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी सुध्दा गावोगावी कायद्याची तोंड ओळख नसल्यामुळे त्याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आजादीच्या अमृत महोत्सवा आणि विधी सेवा सप्ताहानिमित्त न्यायाधीश वर्ग खेडोपाडी जावून कायदेशीर शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करत आहे. या विधि सेवा दिनामुळे प्रत्येक नागरिकांमध्ये कायदेविषयक जानजागृती निर्माण होण्यास मदत होते, असे प्रतिपादन न्यायाधीश साजिद आरीफ सैय्यद यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा, जिल्हा वकील संघ, बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र स्वप्नील चं.खटी यांच्या मार्गदर्शनाखाली 9 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा तारापुर येथे आजादी का अमृत महोत्सव आणि विधी सेवा सप्ताहानिमित्त विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्या.साजिद सैय्यद बोलत होते. पुढे बोलतांना त्यांनी प्रत्येक गावात जावून संपूर्ण कायदे एकाच दिवासात सर्वांना सांगता येणार नाही. परंतु कायद्याची तोंड ओळख होण्यासाठी जर आपण सर्वांनी कायदेशीर माहिती अंगिकृत केल्यास त्याचा फायदा स्वत:च्या अधिकारासाठी निश्चितपणे करता येईल. सध्याच्या काळी एकत्र कुटंब पध्दतीच दिसेनासे होत असल्यामुळे जेष्ठांना डावलण्यात येते. म्हणून जेष्ठ नागरीक कायदा अस्तीत्वात आला आहे. त्यात सुध्दा जेष्ठांना ताबडतोब पोटगी मिळविण्याचा अधिकार आहे, असे न्या. सैय्यद म्हणाले. तर अॅड.सुभाष विनकर यांनी फौजदारी कायदा आणि अॅड.विक्रांत मारोडकर यांनी दैनंदिन उपयोगात येणारे कायदे या विषयावर सखोल मार्गदर्शन उदाहरणे देवून केले.
शेवटी अॅड.अमर इंगळे, सचिव वकील संघ, बुलडाणा यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व वक्त्यांनी मांडलेल्या विचारांचा पुनरुच्चार करुन मार्गदर्शन केले. संचालन अॅड. विक्रांत मारोडकर यांनी केले तर प्रमोद जाधव, सचिव ग्रा.पं.यांनी आभार प्रदर्शन केले. यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी एस.डी.वाठ, अधिक्षक वैभव मिलके, गजानन मानमोडे, खंडारे यांनी परिश्रम घेतले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे कार्यालय आजादीच्या अमृत महोत्सवानिमित्त 2 ऑक्टोंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत सतत 44 दिवस खेडोपाडी जावून लोकात जनजागृती करण्याचे काम करत आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा सल्ला किंवा सहाय्य मागावयाचा असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा येथे भेट देण्याचे आवाहन न्या.साजिद सैय्यद यांनी केले आहे.
