* 18 नोव्हेंबरपर्यंत मिळाली पोलीस कोठडी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यातील केळवद येथील स्टेट बँकेवर दरोडा टाकून बँकेतील लाखो रूपयांची रोकड लंपास करणाऱ्या अज्ञात दरोडेखोरांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे.
केळवद येथील स्टेट बँकेच्या शाखेवर अज्ञात आरोपींनी बँकेच्या मागील भिंतीतील खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला व वीजपुरवठा खंडित करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची जोडणी तोडून आणि गॅस कटरने लॉकर फोडून २० लाख ८१ हजार ५७५ रूपयांची रोकड लंपास केली होती. ही घटना ३० आॅक्टोबरला सकाळी उघडकीस आल्यानंतर चिखली पोलिंसानी गुन्हा दाखल करून आरोपींच्या मागावर होते. यानुषंगाने जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया, अपर पोलिस अधिक्षक श्रवण दत्त, बरजंग बनसोडे, उपविभागीय अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात चिखलीचे ठाणेदार अशोक लांडे यांनी तपास चालविला होता. यानुषंगाने चिखली पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा व सायबर पोलिस स्टेशन बुलडाणा येथील अधिकारी व अंमलदारांचे पाच पथके तयार करण्यात आले होते. या तपास पथकाच्या मदतीने चिखली पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार, गोपनिय माहिती, भौगोलिक परिस्थिती व तांत्रिक पुराव्याच्या आधारावर चंद्रसिंग नरसिंग खुर्दे, अक्षय गजानन अंभोरे दोघे रा.नायगाव ता.चिखली, शिवाजी हरिश्चंद्र देशमुख, प्रदीप ऊर्फ गोलु राजु देशमुख दोघे रा.लोणी लव्हाळा ता.मेहकर व शिवाजी सखाराम गायकवाड रा.नायगाव बु. ह.मु.मेरा खुर्द या पाच जणांना १२ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेवून पोलिस कस्टडी मिळविली होती. दरम्यान अटक आरोपींकडून बँकेतून लूटून नेलेल्या रकमेपैकी ४८ हजार ४० रूपये, गुन्ह्यात वापरलेले हत्यार, साहित्य, वाहने व मोबाईल असा एकूण ७ लाख ५१ हजार ५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाचही आरोपी चिखली तालुक्यातील असून त्यात 3 दरोडेखोर नायगाव येथील तर 2 लोणी लव्हाळा येथील आहे. 13 नोव्हेंबर रोजी सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता पुढील 18 नोव्हेंबरपर्यंत त्यांची पोलिस कोठडीत मिळाल्याची माहिती चिखलीचे ठाणेदार अशोक लांडे यांनी दिली आहे.
सदर गुन्ह्याचा तपासाठी नेमलेल्या पथकांत ठाणेदार अशोक लांडे यांच्यासह सपोनि स्थागुशा, पोनि सायबर पोलिस स्टेशन, सपोनि विलासकुमार सानप, पोउपनि निलेश शेळके, धनंजय इंगळे, श्रीकांत जिंदमवार, श्रीराम व्यवहारे, सफौ. अशफाक शेख, पोहेकॉ सुधाकर काळे, शरद गिरी, निवृत्ती चेके, अताउल्ला खाान, श्रावण गोरे, नापोका राजु आडवे, गणेश पाटील, डिगांबर कपाटे, दिनेश बकाले, युवराज राठोड, सुनिल रिंढे, कडुबा मुंढे, पोकॉ उमेश राजपूत, शिवानंद तांबेकर, नापोकॉ विजय किटे, पंकज मेहेर, पुरूषोत्तम आघाव, सुनिल खरात, पोकॉ सुनिल राजपूत, सुनिल केसकर, गजानन गोरले, कैलास ठोबरे, राहुल बोर्डे मपोकॉ उषा वाघ यांचा समावेश होता. दरम्यान या गुन्ह्यात आणखी गुन्हेगारांचा समावेश असण्याची शक्यता असल्याने त्यानुषंगाने पोलिसांनी तपास चालविला आहे.
