बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
कायदा मला माहीत नाही म्हणून आपणास शिक्षेतून सुट मिळणार नाही. संविधानात वेगवेगळ्या तरतूदी असतांना सुध्दा वेगवेगळे कायदे करण्यात आलेले आहेत. याबद्दल माहिती महिलांना असणे आवश्यक आहे. कायदेशीर माहिती असेल तरच आपणास हक्क आणि अधिकार काय आहेत याबद्दल जाणीव होवून आपण अधिकार प्राप्त करण्याचा प्रयत्न करु. परंतू जर कायदेशीर माहितीच नसली तर आपण त्यापासून वंचित राहू. म्हणून महिलांना कायदेशीर ज्ञानाची ओळख आवश्यक आहे, असे पतिपादन न्या.साजिद आरिफ सैय्यद यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा, जिल्हा वकील संघ, बुलडाणा नगर परिषद संयुक्त विद्यमाने स्वप्नील चं.खटी अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली १३ ऑक्टोबर रोजी नगर परिषद बुलडाणा सभागृह येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्त महिलांचे हक्क व अधिकार संबंधी विधी साक्षरता शिबीर पार पडले.
प्रास्ताविक करतांना न्या.साजिद आरीफ सैय्यद यांनी सांगितले की, महिलांना कायदेशीर ज्ञानाची ओळख व्हावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे अशा स्वरुपाचे जनजागृती कार्यक्रम घेण्यात येतात. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय हे प्रत्येक ठिकाणी न्यायालयाच्या समोर गेटवर असते. कारण न्यायालयात जाण्यापूर्वी एकदा पक्षकाराने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास भेट देवून आपल्या प्रकरणात तडजोडीचा प्रयत्न करावा हा त्यामागचा उद्देश आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे गरजू यांना कलम १२ प्रमाणे मोफत सहाय्य व सल्ला देण्याचे काम करते. आपणास कोणत्याही प्रकारचा सल्ला किंव्हा सहाय्य मागावयाची असल्यास आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा येथे अवश्य भेट द्यावी, असे त्यांनी आवाहन केले. जिल्हा एचआयव्ही अधिकारी प्रमोद टाले यांनी महिलांचे अधिकार व हक्क याविषयी आणि डॉ.गायत्री सावजी यांनी बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अॅड.विजयकुमार सावळे, अध्यक्ष जिल्हा वकिल संघ बुलडाणा यांनी अध्यक्षीय भाषण केले. सुत्रसंचालन सौ.वैशाली तायडे यांनी, महेंद्र सौभागे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी एस.डी.वाठ, अधिक्षक, डी.एस.तोमर, सेवा निवृत्त निबंधक तथा समाजसेवक वैभव मिलके, गजानन मानमोडे यांनी परिश्रम घेतले.
